लढ्यात सहभागी होण्यास अण्णा हजारेंचा होकार
पारनेर (तालुका प्रतिनिधी)- पारनेर, नगर, राहुरी या तीन तालुक्यांतील 25 हजार हेक्टर क्षेत्र लष्कराच्या सरावासाठी के.के.रेंजच्या माध्यमातून संपादित करण्याच्या हालचाली महसूल विभागाच्यावतीने चालू झाल्या आहेत. या तीनही गावच्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शवून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीमध्ये भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी सुमारे 23 गावांचे विरोधाचे ठराव त्यांच्याकडे देण्यात आले. शेतकर्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नासाठी या लढ्यात सहभागी होण्यास अण्णा हजारे यांनी होकार दिला आहे.
या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे आ.लंके यांच्यासह वनकुट्याचे सरपंच राहुल झावरे, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी सभापती सुदाम पवार, अण्णासाहेब बाचकर, राळेगणचे जयसिंग मापारी, झेडपी सदस्य धनराज गाडे,शिंगवे नाईकच्या सरपंच सुनिता सतीश लंगे यांच्यासह गावचे पदाधिकारी तसेच 100-150 ग्रामस्थ उपस्थित होते.पारनेर, नगर, राहुरी तालुक्यातील 23 गावच्या ग्रामस्थांचा या के.के.रेंजच्या विस्तारीकरणात विरोध असून याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करावी अशी मागणी या ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे केली आहे.
याचा फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भेटून आ.लंके यांनी शेतकर्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी या तीनही तालुक्यातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दरबारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या धरणालगत व त्याच्या बॅकवॉटर परिसरातील गावे मोठ्या प्रमाणात असून यामुळे लोकांच्या पुनर्वसनाचा व बागायती क्षेत्राचा प्रश्न निर्माण झाला आहे .त्यामुळे केंद्र सरकारने यावर विचार करावा अशी मागणी वेळोवेळी जिल्हाधिकार्यांसह केंद्र सरकारकडे ग्रामस्थांनी केली होती. या अगोदर राहुरी व पारनेर तालुक्यातील अनेक गावांना मुळा धरणामुळे विस्थापित व्हावे लागले होते. त्याचा मोबदला अजूनही काही शेतकरी शेतकर्यांना मिळाला नाही .त्यातच परत के.के.रेंजचे भूत त्यांच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याने अनेक शेतकर्यांना पुन्हा विस्थापित होण्याची वेळ येणार असल्याची कैफियत हजारे यांच्यासमोर त्यांनी बोलून दाखवली.
एकूण 25 हजार हेक्टर क्षेत्र होणार संपादित
के.के. रेंजच्या विस्तारीकरणात नगर तालुका सहा गावे 1 हजार 131 हेक्टर, राहुरी 12 गावे 13 हजार 561 हेक्टर ,पारनेर 5 गावे 14 हजार 178 हेक्टर असे या तालुक्यातून सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अण्णा व आ.लंकेच्या माध्यमातून चळवळ उभारणार : अॅड.झावरे
पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील अनेक गावे या के.के.रेंजच्या विस्तारामुळे विस्थापित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अनेक बागायची शेतीचा देखील यात समावेश आहे. तरी केंद्र सरकारने राज्य सरकारचा अभिप्राय घेऊन याबाबत सकारात्मक विचार करावा. तसेच या शेतकर्यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी भविष्यात पारनेर राहुरी व नगर तालुक्यातून जनचळवळ उभारणार असल्याचे सरपंच अॅड. राहुल झावरे म्हणाले
मौनव्रत संपल्यानंतर अण्णा संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार
पारनेर, नगर, राहुरी या तीन तालुक्यांतील 25 हजार हेक्टर क्षेत्र लष्कराच्या सरावासाठी के.के.रेंजच्या माध्यमातून संपादित करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेतकरी हादरून गेले आहेत. या प्रश्नाचे गांभीर्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ओळखले असून यासंदर्भात मौनव्रत संपल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.