शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबांनी आपल्या हयातीत कधीच जात, धर्म, पंथ तसेच जन्मस्थळाबाबत उल्लेख केला नाही. ते तर मानवतेचे पुजारी असून शिर्डीत बाबांची समाधी असल्याने या जागेचे महत्त्व वेगऴे असल्याची प्रतिक्रिया माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
बुधवार दि. 22 रोजी शिवसेनेचे आ. दीपक केसरकर यांनी परिवारासह साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. साईदर्शनानंतर आ. केसरकरांनी साईजन्मभूमी वादावर पत्रकारांनी त्यांना पाथरीकर साईंच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, साईबाबांच्या बाबतीत केलेले लिखाण वाचून प्रत्येकाने स्वतः अनुमान लावावे.
मुख्यमंत्र्यांनी पाथरीला जन्मस्थऴाचा दर्जा दिला नसून फक्त एक तीर्थक्षेत्र असल्याची स्पष्टोक्ती देत त्या ठिकाणी विकासासाठी निधी मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील वक्तव्यानंतर साईजन्मस्थळाचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीला निधी दिला जाईल, असेे सांगत वादावर पडदा टाकत शिर्डीकरांचे समाधान केले आहे. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी जन्मस्थळाचा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे म्हणूूून शिवसेनाला घरचा आहेर दिला आहे.