Friday, May 3, 2024
Homeनगरखडका फाटा कारखान्याने सॅनिटायझरचे अल्कोहोल मद्य निर्मितीसाठी विकले

खडका फाटा कारखान्याने सॅनिटायझरचे अल्कोहोल मद्य निर्मितीसाठी विकले

दोन टँकरसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त; 6 अटकेत

नेवासा – तालुक्यातील खडका फाटा येथील मे. भांगे ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड या कारखान्याने सॅनिटायझर निर्मीतीसाठीचे अल्कोहोल अवैधरित्या मद्य निर्मीतीसाठी विक्री केल्याची घटना घडली असून मद्यासाठी विकलेले हे अल्कोहोल मंगळवार दि.5 रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे येथील भरारी पथकाने पकडले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.1चे अधिक्षक यांनी अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात अवैधरित्या मद्यार्काची वाहतूक होत असताना दि. 03 जानेवारी 2020 रोजी गुन्हा क्र. 1/2020 नोंद केला होता. सदर तपासाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार संशयितांना आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेशित केलेले होते. त्यानुसार संशयितांची नियमित चौकशी करुन त्यांच्याकडुन अवैध मद्य निर्मीती व विक्रीबाबत माहिती घेण्यात येत होती.

सदर संशयिताकडुन मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी सॅनिटायझर निर्मीती घटकामध्ये अवैधरित्या मद्यनिर्मीती साठी मद्यार्क छुप्या पध्दतीने देत असलेबाबत माहिती मिळाली. सद्यस्थितीत कोविड-19 या विषाणुचा अनुषंगाने तसेच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अवैधरित्या मद्यनिर्मीती व विक्री होऊ नये त्याअनुषंगाने व माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उक्त ठिकाणी छापा टाकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे, तसेच पराग नवलकर यांनी स्वतः विशेष पथकासमवेत सदर कारवाई केली.

नेवासे तालुक्यातील मे. भांगे ऑरगॅनिक केमिकल्स लि. या ठिकाणी सॅनिटायझर निर्मीतीसाठी परवानगी अन्न व औषध प्रशासन यांचेकडून घेतली होती. सॅनिटायझर निर्मीतीच्या नावाखाली अवैधरित्या मद्यार्क हे मद्य निर्मीतीसाठी छुप्या पध्दतीने दिले जात असल्याचे दिसून आले. सदर छाप्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

40 हजार 535 लिटर मद्यार्क (अल्कोहोल), तीन वाहने (टँकर- 2, चारचाकी 1) मद्यार्क किंमत न 20 लाख 67 हजार 282 रुपये दोन टँकर किंमत 43 लाख रुपये तसेच चार चाकी किंमत – तीन लाख रुपये व इतर मुद्देमाल 8 हजार 300 रुपये असे एकुण मुद्देमाल किंमत 66 लाख 75 हजार 585 रुपये सह 6 आरोपी अटक करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींगध्ये उस्मान सय्यद शेख, संजय भाऊसाहेब भांगे, ज्ञानेश्वर विष्णु मगर, तानाजी सखाराम दरांडे, शामसुंदर वसंतराव लटपटे, शिवाजी भागुजीराव शिंदे यांचा समावेश आहे.

सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, याच विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व पराग नवलकर (अहमदनगर)यांनी स्वत: तसेच राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अनिल पाटील (अहमदनगर), दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव, दिपक सुपे तसेच जवान सागर धुर्वे, गोरख नील, व तात्या शिंदे यांनी सहभाग घेतला, पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव (पुणे) हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या