दार्जिलिंगच्या 5 महिलांसह राहात्याचा चालक गंभीर जखमी
कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार भगवतीपूर येथील शनी मंदिरानजीक पुलावर शिवशाही बस आणि ईरटीका कारचा समोरासमोर जबर अपघात झाला. ईरटीका कारमधील दार्जिलिंगच्या 5 महिला प्रवाशी व राहाता येथील चालक गंभीर जखमी झाला. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ईरटीका कारच्या अग्रभागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
काल सोमवारी दुपारी कोल्हारच्या पुलावर ही घटना घडली. कोपरगाव-पुणे (क्रमांक एम. एच. 14 जी. डी. 8440) ही शिवशाही बस नगरच्या दिशेने धावत होती. तर ईरटीका क्रमांक ( एम. एच. 17 5150) शनिशिंगणापूरहून शिर्डीकडे चालली होती. यातच दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. बसची उजवी बाजू तुटली. मात्र ईरटीकाचे प्रचंड नुकसान झाले.
शनिशिंगणापूर येथून शनीदर्शन आटोपून शिर्डीला साई दर्शनाला निघालेल्या ईरटीका मधील प्रवाशांना मोठी दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामध्ये अपर्णा अनिल लामा (वय-20), पार्वती चंद्रप्रकाश लामा (वय-64), पूनम अनिल लामा (वय-42), कांची देंढू डुबका (वय-65), नारीम उदय डुबका (वय-50), सर्व राहणार दार्जीलिंग या 5 महिला तर चालक निखिल संजय अत्रे (वय-23) हे गंभीर जखमी झाले.
अपघात घडल्यानंतर पुलावरील वाहतूक दुतर्फा खोळंबली होती.प्रारंभी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेकरिता ठिकठिकाणी फोन केले. गावात रुग्णवाहिका यावेळी उपलब्ध नव्हती.
अखेरीस कोल्हार पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः रुग्णवाहिका घटनास्थळी आणली व जखमींना तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मात्र फोन केलेल्या सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असल्याची माहिती समजते.