सेनेचा एक गट भाजपाला मिळाल्याने कोपरगावात महाविकास आघाडीचा फज्जा
कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्य निवडीत सात समित्यांपैकी भाजपला चार व सेनेला दोन विषय समित्या मिळाल्या. मात्र राज्यात व नगर जिल्हा परिषदेत ज्याप्रमाणे महाआघाडी झाली तिची पुनरावृत्ती होणे अपेक्षित असताना कोपरगावात मात्र सेनेच्या एका गटाने भाजपशी सलगी केल्याने महाविकास आघाडीचे कोपरगावात तीन तेरा वाजले. कोपरगाव सेनेत अंतर्गत धुसफूस असल्याचा संदेश राज्यभर गेला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या विषय समित्यांची मुदत संपली होती. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात मंगळवारी विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यावेळी सात समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष) यांची पदसिद्ध सभापती म्हणून स्थायीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे तर उपसभापती उपाध्यक्ष योगेश तुळशीराम बागुल (शिवसेना कोल्हे समर्थक) यांचीही पदसिद्ध सभापती म्हणून नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे.
निवड झालेल्या सभापतींची नावे – अनिल विनायक आव्हाड, (शिवसेना कोल्हे समर्थक) सभापती स्वच्छता व वैद्यकीय व आरोग्य, ताराबाई गणपत जपे,(कोल्हे-भाजप) सभापती महिला व बालकल्याण, आरिफ करीम कुरेशी (कोल्हे-भाजप) सभापती सार्वजनिक बांधकाम, स्वप्नील शिवाजी निखाडे (कोल्हे-भाजप)सभापती पाणीपुरवठा व जलनि:सारण, मंगल बाळासाहेब आढाव (कोल्हे-भाजप) सभापती शिक्षण, दीपा वैभव गिरमे (कोल्हे-भाजप) सभापती महिला व बालकल्याण. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती पदी विजय वहाडणे यांची तर अन्य विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असून उपाध्यक्ष योगेश बागुल हे पदसिद्ध नियोजन व विकास समितीचे सभापती असून ते स्थायीचे पदसिद्ध सभापती आहे.
अन्य समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असून असे सात पदसिद्ध सदस्य असून अन्य तीन सदस्यांमध्ये रवींद्र नामदेव पाठक,(कोल्हे-भाजप), ऐश्वर्याताई संजय सातभाई, (सेना-कोल्हे समर्थक) तर राष्ट्रवादीचे मंदार पहाडे या एकमेव नगरसेवक यांची वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली त्यात आलेले अर्ज वैध ठरले. माघारीच्या दिलेल्या मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सहाय्य केलेे. निवडणूक शांततेत पार पडली. विषय समित्यांच्या निवडणुकीत राज्यस्तरावरील महाआघाडीचा प्रयोग व्हावा या साठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले हे प्रयत्नशील होते त्यांनी सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख सनी वाघ, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, यांच्याशी पत्रव्यवहार करून महाआघाडी वास्तवात यावी यासाठी मोठे प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी संपर्क केल्याचे सांगत आपण वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे शिवसेना नगरसेवकांना याची कल्पना देऊन महाआघाडीचेच पालन करण्याची स्पष्ट कल्पना दिली होती. त्यांनी आपण कोल्हे गटाला सोडू शकत नसल्याचे त्यांनी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांना सांगितले. आपल्याला सेनेच्या दुसर्या गटाने प्रतिसाद दिला नाही. आपण या बाबत संपर्क प्रमुख अनिल माहापंकर याना तसे सांगितले आहे.
– राजेंद्र झावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख
26 सदस्य असलेल्या कोपरगाव पालिकेत सत्ताधारी भाजपाचे 13, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, शिवसेना 6 व अपक्ष 1 असे बलाबल आहे. समित्यांमध्ये सत्ताधार्यांनी सलग तिसर्यांदा सर्व विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध करण्यात यश मिळविले. शिवसेनेचे गटनेते उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल हे नियोजन व विकास समितीचे सभापती झाले. शिवसेनेचे अनिल विनायक आव्हाड हे चौथ्यांदा स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य समितीचे सभापती तर स्वप्नील शिवाजी निखाडे हे दुसर्यांदा पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीचे सभापती झाले आहेत प्रत्येक समितीत सात सदस्य संख्या असून सेना-भाजप युतीचे पाच सदस्य तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.