Saturday, November 23, 2024
Homeनगरमुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून ना. गडाखांनी घेतली सेनेचे उपनेते राठोेड यांची भेट

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून ना. गडाखांनी घेतली सेनेचे उपनेते राठोेड यांची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) – कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये प्रथमच येणारे शंकरराव गडाख यांनी माजी मंत्री तथा सेनेचे उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. त्यासाठी ते चितळे रस्त्यावरील ‘शिवालया’त पोहचले. दोघांत बंद दाराआड पंधरा मिनिटे चर्चा झाली. सेनेचा जयघोष करत मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी सत्कारही केला.

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यनंतर शंकरराव गडाख प्रथमच नगर शहरात आले. सर्वात अगोदर त्यांनी शिवसेनेचे संपर्क कार्यालय म्हणून ओळखले जाणारे ‘शिवालय’ गाठले. तेथे अनिल राठोड यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तेथे होते. चर्चेनंतर मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी जयघोष करत सत्कार केला. मंत्री गडाख तेथून जवळच असलेल्या नगर वाचनालयात पोहचले. तेथे त्यांनी वाचनालयासाठी पुस्तक खरेदीला 21 हजार रुपयांची देणगी दिली.

- Advertisement -

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, तालुका प्रमुख संदेश कार्ले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अनिल लोखंडे, सुभाष लोंढे, सुरेश तिवारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत गडाखांनी त्यांना अभिवादन केले.
नगर शहरात शिवसेनेत गटबाजी उफाळून आली आहे. मंत्री पदाची शपथ घेतलेले गडाख यांच्या भेटीसाठी नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक अनिल लोखंडे थेट सोनईत पोहचले. तर आज मंत्री गडाख शिवालयात आले. तेथे उपस्थित शिवसैनिक पाहता शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
………………………
अनिल राठोड यांनी सलग पाच टर्म नगरमधून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले. मात्र गत दोन टर्मपासून त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. राठोड यांचे पुर्नवसन करावे यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही भेटले आहे. राठोड यांना विधानपरिषद देऊन त्यांचे पुर्नवसन होणार की महामंडळ देऊन समाधान केले जाणार याकडे नगरकरांचे लक्ष असतानाच गडाख-राठोड यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे अनेक तर्कविर्तक काढले जात आहे.
…………………………….

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून भेट
‘नगरला गेल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन या, उपनेते अनिल राठोड यांची भेट घ्या’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ना. गडाख यांना सांगितल्याचे समजते. तशी चर्चा ना. गडाख यांनी शिवालयाला भेट देऊन गेल्यानंतर होती. ना. गडाख यांच्या भेटीमुळे राठोड विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या