Friday, November 15, 2024
Homeनगरपाथरी ही साईंची जन्मभूमी तर शिर्डी कर्मभूमी – आ. दुर्राणी

पाथरी ही साईंची जन्मभूमी तर शिर्डी कर्मभूमी – आ. दुर्राणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार बाबा जानी दुर्राणी यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरी तर कर्मभूमी शिर्डी असून शिर्डीकरांना कशाची भीती वाटते असे वक्तव्य करुन एका नवीन वादाला तोंड फोडले आहे.

साईंची जन्मभूमी नगर जिल्ह्यातील शिर्डी की, परभणी जिल्ह्यातील पाथरी असा साईबाबांच्या जन्मस्थळावरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती आले असता त्यावेळी साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा नामोल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर शिर्डी बस स्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता.

- Advertisement -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे या वादाला तोंड फुटले होते. शिर्डी शिवाय साईबाबांचा कुठेही उल्लेख नसावा. कारण साईबाबांच्या जन्मभूमीचा उल्लेख कशातच नसल्यामुळे नाहक पाथरीला साईबाबांच्या जन्मस्थानाचा दर्जा देऊन साईभक्तांमध्ये एक नवीन वाद निर्माण केला जात आहे. त्यामुळे पाथरीला जन्मभूमीचा दर्जा देण्यास शिर्डीकरांचा तीव्र विरोध आहे.

याबाबत पाथरीचे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले की, साईबाबांची जन्मभूमी पाथरी असून कर्मभूमी शिर्डी आहे. त्यामुळे जन्मभूमी पाथरीचा उल्लेख केला तर शिर्डीचा दर्जा कमी होणार नाही. भाविक शिर्डीला आल्यानंतर पाथरीलाही येतील आणि पाथरीला आल्यानंतर शिर्डीलाही जातील. हा वाद निर्माण करुन शिर्डीकरांना भीती कशाची वाटत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचे काहीही कारण नाही.

कोणताही उल्लेख नसताना पाथरीला साईंची जन्मभूमी म्हणून वाद का ?
साईबाबांच्या जन्मभूमीबाबत तसेच त्यांची जात, पात, धर्म अशा प्रकारची माहिती वा उल्लेख नसताना किंवा अशा प्रकारची माहिती कोणाकडे सांगितलेली नसतानाही पाथरी ही जन्मभूमी कशी असू शकते? आमच्यासाठी साई चरित्र हेच अंतिम असून आम्ही त्यास मानतो. त्यामुळे चरित्रातही अशी कोणतीही माहिती नाही. हा वाद कायमचा मिटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिर्डी ग्रामस्थासह लोकप्रतिनिधींना बोलावून त्याबाबतची बैठक बोलवावी व याबाबतची सखोल चर्चा करावी. शासनाने अशा प्रकारची कोणतीही चूक करू नये. पाथरीला शासनाने दत्तक घेऊन त्या गावाचा विकास केला तरी चालेल परंतु साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करू नये.
-कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्ष शिर्डी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या