अहमदनगर (प्रतिनिधी) – शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे, परंतु अभियंते व कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्यामुळे जनतेला वेळेवर सुविधा देणे शक्य होत नाही, यासाठी शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच मंजुरी मिळविणार आहे. शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी अडचणीच्या काळात अनेक प्रसंगाला तोंड देत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. त्याच्या अनुभवाचा उपयोग पुढील काळातही व्हावा अशी अपेक्षा, आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या सेवापूर्ती व निरोप समारंभानिमित्त अभियंता संघटनेतर्फे आ. जगताप यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी, उपमहापौर मालनताई ढोणे, सभापती मुदस्सर शेख, सभापती लताताई शेळके, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व सुनील पवार, बाळासाहेब पवार, संजय ढोणे, इंजि. परिमल निकम, सुरेश इथापे, आर. जी. मेहेत्रे, महादेव काकडे, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, गणेश गाडळकर, आर. जी. सातपुते, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मेहेर लहारे, शहनाज तडवी, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, अनंत लोखंडे आदी उपस्थित होते.
प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी म्हणाले, नोकरी करत असताना एकमेकांपासून खूप शिकायला मिळते. मनपा आयुक्त पदभाराच्या काळात खूप काही शिकलो. सोनटक्के शांत स्वभावाचे आहेत. मला उशिरा कळले की सोनटक्के यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. अगोदर समजले असते तर मी त्यांना स्वेच्छानिवृत्ती न घेण्याबाबत आग्रह धरला असता. त्यांच्यासारख्या अधिकार्यांची महापालिकेला गरज आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही अभियंता सोनटक्के यांनी चांगले काम केले. प्रत्येकाने प्रामाणिकपणाने काम केल्यास त्या कामामधून आपल्याला आत्मियता मिळते. अभियंता सोनटक्के म्हणाले, मला मनपामध्ये 35 वर्षे काम करीत असताना सर्व प्रशासनाचे, पदाधिकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रामाणिकपणे मनपामध्ये काम केले. विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. कौटुंबिक कारणास्तव मी स्वेच्छासेवानिवृत्ती घेत आहे. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, परिमल निकम, सुरेश इथापे, अनंत लोखंडे, बाळासाहेब पवार आदींचे भाषण झाले. सूत्रसंचालन सुरेश भालसिंग यांनी केले. महादेव काकडे यांनी आभार मानले.