मुख्य आरोपी मुंबई येथील विक्रीकर भवनात विक्रीकर निरीक्षक
जामखेड (तालुका प्रतिनिधी) – पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 45 लाख रुपये घेऊन ये अन्यथा घटस्फोट देईन अशी वारंवार धमकी देऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सासरच्या तब्बल 18 जणांविरुद्ध हुंडाबळी अंतर्गत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा मुंबई येथील विक्रीकर भवनात विक्रीकर निरीक्षक म्हणून नोकरीस आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील फक्राबाद पासून जवळच असलेल्या एका गावातील 25 वर्षीय तरुणीचा विवाह 19 एप्रिल 2018 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरात राहणार्या गणेश पांडुरंग गोरे या तरुणाशी रितीरिवाजाप्रमाणे जामखेड शहरातील एका मंगल कार्यालयात पार पडला होता. लग्नानंतर महिनाभर फिर्यादी विवाहित तरुणीच्या सासरच्या लोकांनी तिला चांगले नांदिवले. मात्र एक महिन्यानंतर पती गणेश गोरे, सासरे पांडुरंग गोरे, सासू लता गोरे, दीर अतुल गोरे यांनी फिर्यादीला माहेराहून पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी 45 लाख रुपये घेऊन ये नाहीतर सोडचिठ्ठी दे यासह विविध कारणांतून विवाहितेला मारहाण व छळ केला आहे.
याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती गणेश पांडुरंग गोरे (विक्रीकर निरीक्षक मुंबई बांद्रा) पांडुरंग केशव गोरे, लता पांडुरंग गोरे, अतुल पांडुरंग गोरे, मयंक कालिदास दिवाण, गयाबाई केशव गोरे, दत्तात्रय केशव गोरे, रेखा दत्तात्रय गोरे (सर्व राहणार विद्यानगर, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद) बिरमल शंकर होगले, पुतळाबाई बिरमल होगले, बाळासाहेब बिरमल होगले, सुशीला बाळासाहेब होगले, वैशाली महादेव होगले, महादेव बिरमल होगले (सर्व राहणार तांदूळवाडी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद) चांगदेव सूर्यभान शिंदे, विजया चांगदेव शिंदे, करण चांगदेव शिंदे, हौसराव चांगदेव शिंदे (सर्व राहणार अंदोरा, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद) अशा 18 जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ शिवाजी भोस हे करीत आहेत.