Friday, November 15, 2024
Homeनगरमुळा डाव्या व उजव्या कालव्यांचे आवर्तन लांबले; शेतकरी संतप्त; रब्बीला फटका

मुळा डाव्या व उजव्या कालव्यांचे आवर्तन लांबले; शेतकरी संतप्त; रब्बीला फटका

वळण (वार्ताहर) – सध्या नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे मुळा व भंडारदरा धरणाचे आवर्तन लांबले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून रब्बीच्या पिकांना आता आवर्तनाची गरज भासत असल्याने मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी केली आहे. मुळा धरणाच्या आवर्तनाला कालवा सल्लागार समितीचा कोलदांडा असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खा. डॉ. सुजय विखे यांनी सरकार दरबारी आपले राजकीय वजन वापरून आवर्तन सोडण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांचे पीक पाटाच्या पाण्यावर अवलंबून आहे, ते सध्या आवर्तन लांबणीवर पडल्याने हवालदिल झाले आहेत. अनेकदा मागणी करूनही अद्यापही आवर्तन सुटलेले नाही. मुळा डावा कालव्यावरील शेतकर्‍यांचे ऊस खोडवे-निडवे तुटून गेले आहेत.

- Advertisement -

एकतर शेतकरी अतिवृष्टीमुळे होरपळून निघालेला आहे. मुळा धरण राहुरी तालुक्यात असूनही राहुरी तालुक्यात राजकारणापायी वेळेवर पाणी मिळत नाही. मुळा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी राहुरी तालुक्याची सध्याची स्थिती झाली आहे. खा. डॉ. सुजय विखे व ना. प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःचे राजकीय वजन वापरून तात्काळ मुळा डावा व उजवा कालव्यांना पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत व शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील शेतकरी प्रकाश खुळे, बी. आर. खुळे, काशीनाथ खुळे, वसंत आढाव, ज्ञानेश्वर खुळे, प्रकाश आढाव, बाबासाहेब खुळे, अशोकराव कुलट, एकनाथ खुळे, रोहिदास आढाव, भाऊ काळे, बाबासाहेब आढाव, नितीनराव आढाव, उमेश खिलारी, आदींनी केली आहे.

मागील सलग पाच वर्षांपासून राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात डाव्या आणि उजव्या कालव्याला धरणातील अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे आवर्तनात कपात करण्यात आली होती. यंदा ऑगस्ट महिन्यात दोनदा पूर्ण क्षमतेने धरण भरले आहे. मात्र, कालवा सल्लागार समिती आवर्तनाच्या बाबतीत वेळकाढूपणा करीत असल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. तातडीने आवर्तन सोडा, अन्यथा शेतकर्‍यांचा उद्रेक होईल, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या