मुंबई : कोरोना या जीवघेण्या विषाणूची लागण झालेला दुसरा रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. संबंधित विद्यार्थीनी चीनमधून परतली असून, तिला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केरळमध्ये याआधीही करोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला होता. आज केरळमध्ये चीनहून काही दिवसांपूर्वी परतलेल्या विद्यार्थीनीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या विद्यार्थीनीची प्रकृती स्थिर असून, तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजाराच्या आसपास प्रवासी तपासण्यात आले आहेत .मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेड मध्ये आतापर्यंत १५ जणांना सौम्य, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसल्याने त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले होते. या सर्वाचे तपासणी अहवाल नकारात्मक असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिली आहे.