मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून गेल्या १२ तासांत कोरोनाचे ३०२ रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३५ वर पोहचला आहे.
दरम्यान केंद्र तसेच राज्यसरकार याबाबत ठोस पाऊले उचलत असले तरी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
आतापर्यंत देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३७४ वर पोहचली आहे. यातील ३०३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच २६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात १४५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६३५ वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज राजस्थानमध्ये ६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील एका रुग्णाने दिल्लीतील तबलीगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सध्या राजस्थानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २१० वर पोहचली आहे.
याशिवाय लखनऊमध्ये गेल्या ४८ तासांत १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांनी देखील दिल्लीतील तबलीगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.