Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर-मनमाड मार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद

नगर-मनमाड मार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आठ आरोपी अटक, अल्पवयीन ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना काळात रोडवरील वर्दळ कमी असल्याचा फायदा घेऊन नगर-मनमाड महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्तालूट करणार्‍या सराईत गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. हे सर्व आरोपी राहुरी, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील असून लाँकडाऊन काळात त्यांनी रस्तालूट करून या परिसरात दहशत निर्माण केली होती.

- Advertisement -

आरीफ गब्बुर शेख (वय- 25 रा. अवघड प्रिंपी ता. राहुरी), सागर गोरख मांजरे (वय- 24 रा. मातापूर ता. श्रीरामपूर, हल्ली रा. शिवाजीनगर, नगर), अविनाश श्रीधर साबळे (वय- 22 रा. राहुरी ता. राहुरी), सुखदेव गोरख मोरे (वय- 23), चेतन राजेंद्र सणासे (वय- 19, दोघे रा. पिंपळवाडी रोड ता. राहाता), अक्षय सुदाम माळी (वय- 22 रा. खंडोबा चौक ता. राहाता), अक्षय सुरेश कुलथे (वय- 20 रा. मल्हारवाडी रोड ता. राहुरी), सागर पोपट हरिश्चंद्रे (वय- 22 रा. धामोरी खुर्द ता. राहुरी) या आठ जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींवर नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

17 मे रोजी रात्री लालजी रामपालसिंग तोमर (रा. मध्यप्रदेश) व त्यांचे दोन साथीदार मध्यप्रदेश येथून गहू घेऊन कोपरगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये खाली करण्यासाठी येत होते. कोपरगाव शहराजवळ पहाटे पत्ता विचारण्यासाठी थांबले असताना त्यांना चौघांनी लोखंडी कत्तीचा धाक दाखवून 56 हजारांची रोकड काढून घेतली होती. या प्रकरणी तोमर यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच दिवशी पहाटे पाच वाजता वैभव फुला वाघ (रा. सटाणा, जि. नाशिक) हे सोलापूर येथून नाशिककडे जात असताना पुणतांबा चौफुला येथे थांबले होते.

यावेळी चौघांनी त्यांना कत्तीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील 35 हजारांची रोकड काढून घेतली होती. या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 21 मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास नगर- मनमाड रोडवरील पिंपरी निर्मळ शिवारात मालेगाव (जि. नाशिक) येथील असिफखान सरदारखान यांना चौघांनी कत्तीचा धाक दाखवून एक लाख 12 हजारांची रोकड काढून घेतली होती. त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरील गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. हेे गुन्हे आरीफ शेख व सागर मांजरे यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती निरीक्षक पवार यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने शेख व मांजरे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारणा केली असता अन्य आरोपींच्या मदतीने गुन्हे केले असल्याची कबूली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्य आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तीन दुचाकी, एअर गण असा एक लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डॉ. सागर पाटील, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, शिशिषकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार नाणेकर, पोलीस कर्मचारी मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, संतोष लोढे, विशाल दळवी, रंजित जाधव, राहुल सोळंके, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, किरण जाधव, सागर सुलाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

लुटमारीचे नियोजन शेतात
टोळीतील आरोपी राहुरी येथील सुखदेव मोरे यांच्या शेतात रात्री एकत्र जमायचे. पहाटे तीन नंतर मोटरसायकलवरून नगर-मनमाड महामार्गाने रेकी करायचे. एकटा वाहनचालक दिसला की त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटायचे. वाहनचालकाने याची कुणाला माहिती देऊ नये म्हणून त्याचा मोबाईल फोडून टाकायचे. लुटमार होत असताना एक आरोपी इतर वाहने व पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवून असायचा.

- Advertisment -

ताज्या बातम्या