कोतवालीनंतर तोफखान्यातील हवालदार अडकला
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदारा ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकल्यापाठोपाठ तोफखान्याचा हवालदारही अडकला. सलग दोन दिवस दोन पोलीस एसीबीच्या ट्रॅपमध्ये सापडल्याने पोलीस दलातील लाचखोरी समोर आली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदार पोपट पंडित रोकडे असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी रोकडे याने थेट कलेक्टर ऑफिसचे आवार निवडले. तेथेच एसीबीने रोकडे यास लाच घेताना रंगेहात पकडले.
वहिनीसोबतचा कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल न करता तो अदखलपात्र नोंदविण्यासाठी रोकडे याने 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच घेताना रोकडे यास एसीबीने पकडले.
गुरूवारी कोतवाली पोलीस ठाण्याचा हवालदार अनिल गिरी गोसावी यास 5 हजार रुपयांचा लाच घेताना पकडल्यानंतर शुक्रवारी तोफखान्यातील हवालदार रोकडेदेखील एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकले. सलग दोन दिवसांच्या या कारवाईने पोलिसांतील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.