श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – स्व. शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रकिया सुरू झाली असून प्रारूप मतदारयादी तयार होताना तब्बल 13 हजारांच्या आसपास सभासद अपात्र ठरले असताना आता नागवडे यांचे समर्थक असणारे अनेक सहकारी त्यांच्याच विरोधात जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत असताना विद्यमान व्हाईस चेरमन केशवराव मगर यांच्या बरोबर नागवडे विरोधकांच्या बैठका पार पडत असून लवकरच नेमके चित्र स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीत नागावडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यानी काँगेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र नागवडेंच्या अनेक समर्थकांना हा निर्णय खटकला असल्याने त्यांच्या अनेक सहकार्यांनी राष्ट्रवादी चे उमेदवार घनश्याम शेलार यांच्यासाठी काम केले. इकडे पाचपुते आमदार झाले; मात्र राज्यात भाजप सरकार गडगडले आणि दुसरीकडे नागवडेंवर शेलार नाराज झाले. आता नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक पडघम वाजू लागले असताना राजेंद्र नागवडे यांना भलतीच कसरत करावी लागणार असे दिसत आहे.
दहा पंधरा वर्षांपासून कारखान्याचे व्हाईस चेअरमन असलेले केशवराव मगर हेच नागवडे विरोधात उतरण्याची तयारी करत असून त्यांना विरोधाची रसद घनश्याम शेलार पुरवीत असतील आणि इतर काही नागवडे विरोधक मगर यांच्या बरोबर बैठका करत आहेत. दौंड आणि शहरात अशी बैठक झाली. आता राजेंद्र नागवडे यांनीही कारखाना निवडणूक ताकतीने लढण्याचा आणि कारखाना आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी केलेली तयारी व विधानसभा निवडणुकीत पाचपुते यांना केलेल्या मदतीची परतफेड पाचपुते कशी करणार यावर अनेक गणिते अवलंबून आहेत.
मगर यांच्या निर्णयाकडेच लक्ष
विद्यमान कारखाना उपाध्यक्ष केशवराव मगर हे अधिकृतपणे नागवडेंविरोधात भूमिका मागील सहा महिन्यांपासून घेत असताना आता नागवडे विरोधकांनीही मगर यांच्याच खांद्यावर भार टाकला आहे. निवडणुकीत नागवडे विरोधात पॅनल उभा राहिला तर मगर यांना भलतीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसत असले तरी नागवडे परिवारावर अनेकांची श्रद्धा असल्याने नागवडे यांच्या हातातून कारखाना सत्ता खेचणे अवघड आहे.
निवडणुकीत पाचपुते नागवडेंच्या बरोबर का?
स्वत:ची महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीतून नागवडे कुटुंबीयांनी माघार घेत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विजयात भूमिका निभावली आहे. याची परतफेड श्रीगोंदा कारखाना निवडणुकीत पाचपुते करणार का असा प्रश्न असला तेरी नागवडे कारखाना निवडणुकी बाबत पाचपुतेंची अधिकृत भूमिका आलेली नाही.
मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढा देऊ – राजेंद्र नागवडे
श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – प्रादेशिक सहसंचालक(साखर) तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार नागवडे कारखान्याने प्रारूप मतदारयाद्या सादर केल्या आहेत. कारखाना निवडणुकीत सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यावर आम्ही आजही ठाम आहोत. त्यासाठी कारखान्याचा पाठपुरावा सुरू असून अधिकाधिक सभासदांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढा देऊ, असे मत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.
नागवडे म्हणाले की, प्रादेशिक सह संचालक (साखर) आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे प्रारूप मतदारयाद्या तयार करून प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार प्रथमतः नऊ हजार 589 सभासद मतदानास पात्र ठरले आहेत. सर्व सभासद मतदानास पात्र ठरण्यासाठी संचालक मंडळाने तीन ठराव केले आहेत. यामध्ये शेअर्स अपूर्ण असणार्या सभासदांना शेअर्स पूर्ण करण्यासाठी एकवर्षं मुदतवाढ देण्याचा निर्णय 23 डिसेंबर 2019 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच ज्या सभासदांचे शेअर्स पूर्ण आहेत, परंतु त्यांचा ऊस आला नाही अशा सभासदांना देखील मतदानाचा अधिकार देण्यासंबंधीचा आणि वार्षिक सभेला गैरहजर असणार्या सभासदांची वार्षिक सभांची गैरहजेरी क्षमापित करण्याचा असे दोन ठराव 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आले आहेत.
याशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेनेही अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत केलेली आहे.प्रादेशिक सहसंचालक स्तरावर पाठपुरावा करुन सर्व सभासदांना येत्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. मात्र सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू अशी ग्वाही त्यांनी दिली. नागवडे कारखान्याची भूमिका सर्व सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्याची भमिका शेवटपर्यंत कायम राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.