नाशिक : शिवकार्य गडकोटच्या आडगाव येथील माळोदे वस्तीवरील प्राचीन बारव ची स्वच्छता संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे. शिवकार्य गडकोटच्या मावळ्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे बारवने मोकळा श्वास घेतला आहे. या मोहिमेत लहान बालकांपासून ते तरुण, वयोवृद्ध यांसर्वांच्या सहभागातून या किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आज जीर्ण झाले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संस्था, आणि युवा कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झटत आहेत. त्याच प्रमाणे शिवकार्य या गडकोटांचे संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थेचे कामही उल्लेखनीय आहे.
या मोहिमेत आडगाव येथील माती व कचऱ्याने बुजलेल्या अवस्थेतील कुंडस्वरूप आकारातील प्राचीन बारवेच्या अस्तित्वासाठी दिवसभर केलेल्या अभ्यासपूर्ण श्रमदानातून बारवेत असलेली माती, गाभाऱ्यातील अस्ताव्यस्त दगड, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या काढल्या. शिवकार्य गडकोटची ही ९८ वी बारव संवर्धन मोहीम होती.