कुठल्यातरी अनपेक्षित गाफील क्षणी आपणही अंतिम प्रवासाच्या टप्प्यावर पोहचणार असतोच नकळत…कुठलीच चाहूल, मागमूस, पूर्वकल्पना, कुणकुण किंचीतही लागणार नसते चुकूनही आपल्याला…
आपण असताना अन गेल्यावरही नित्याचीच पहाट, सकाळ, मध्यान्ह अन सायंकाळही अटळच! त्या-त्या वेळेला ते-ते नियमित होतच राहणार असतं…पण….पण ती ‘त्या’ तारखेची सायंकाळ आयुष्याची ‘सायंकाळ’ नसणार ही शाश्वती कुणी द्यायची आणि कुणाला?… कारण सारेच प्रवासी घडीचे!अलीकडे तर मानवी जीवनाचा अंतिम अटळ चेहरा तर सारखाच स्पष्ट तरळतोय नजरेसमोर! गेले काही दिवस कोंडून घेतलंय स्वतःला कडेकोट चार भिंतींत, तरीही काळी सावली आहेच आतबाहेर दहशतीची… ही दहशत आहे अफाट विश्वाला ताब्यात घेऊन नष्ट करू पाहणाऱ्या ‘सूक्ष्म’ विषाणूची!
हे भय-भीती कुणी दाखवत नाहीये तर आपलीच आपल्याला आतून वाटू लागलीय, कारण आपलं जगण्यावर विलक्षण प्रेम आहे. जरी कधीतरी संतापात आपण म्हणत असलो की, ‘मरण आलं तर बरं होईल एकदाचं!’ ही भीती मलाच वाटतेय असेही नाही, प्रत्येकाला वाटू लागलीय….ती नजरेत दिसते प्रत्येकाच्या, हालचालीत दिसते, चेहऱ्यातून सांडते! गेले काही दिवस तर ती खूप काही शिकवतेय आपल्याला.
कित्येक पदव्या घेतल्या तरी जे शिकायचं राहून गेलं होतं ते-ते सारं शिकवतेय. ती शंका घ्यायला शिकवू लागलीय, ती हात आखडता घ्यायला शिकवतेय, काटकसरीने जगायला शिकवतेय. बाहू आलिंगनासाठी नाही फैलावू देत ती आता…स्पर्श प्रत्येकवेळी धीर देणाराच असतो असे नाही तर घात करणारा आणि मरणाचे असंख्य सूक्ष्म विषाणू देणाराही असतो हेही अलीकडेच कळू लागलेय आपल्याला.
पैसा श्वास विकत घेऊ शकत नाही, मोजक्या शिध्यातही समाधानाने गुजराण करता येते. आपलं घर सर्वात सुंदर आणि सुरक्षित जागा आहे जगाला हे ही पटलंय. संशयखोरही होतेय असे हल्ली, प्रत्येक सजीव-निर्जीव आता धोकादायक वाटताय ह्या दिवसात…एक बरे आधीपासूनच विज्ञानवादी होते म्हणून रोगापासून दूर राहण्यासाठी वैद्यकीय सूचना पाळतेय….
कित्येक वर्षांत सगळे घरी निवांत बसलोय असे आठवतच नाहीये. मौजमस्तीत हसतखेळत कामं केलीत, सहकुटुंब सोबत जेवलोय हेही आठवत नाही. हल्ली मात्र सतत लेकरंबाळं समोर असावीत असं वाटतं आणि तशी घुटमळत राहते मीही त्यांच्या अवतीभवती! नवरा मागे कधीतरी म्हणालेला, ‘तुझ्या हातचा मुगाचा शिरा अन गुळ घालून शेवया खाऊन किती दिवस लोटले गं! काढ न वेळ एकदा…! आता जाणवतंय किती माफक अपेक्षा असतात कुटुंबाच्या आपल्याकडून. खरंच की, विसरलोच आपण हे! मलाच माझं ‘क्लिक’ झालं. हवे ते पदार्थ करून खाऊ घालतेय गेले काही दिवस… नेमकं कारण मलाही उमजत नाही.
आजूबाजूलाच असावी मुलं सतत वाटत राहतं, माध्यमात आलेल्या कित्येक बातम्या, चित्रफिती दाखवत सुटते त्यांना, रुग्णांच्या बातम्या- आकडेवारी, मृत्यू-बाधित सांगत राहतेय सतत…मुलं बघत राहतात अचंबित विस्फारल्या डोळ्यांनी आईतला हा कमालीचा बदल… सतत घड्याळाच्या काट्यासोबत धावणाऱ्या आईला काळजी वा भय वाटतंय कसलंतरी हे मात्र त्या निरागस चेहऱ्यांना उमजलंय. मुलं किती बिनघोर असतात नाही? आईबापावर असलेल्या अफाट विश्वासावर… कधी कधी वाटतं आपणही उगाच ‘मोठे’ झालो!
कित्ती कित्ती वेगाने धावत असतो आपण, जगण्याच्या स्पर्धेत. ज्यासाठी सारं कमावतो त्यासाठीही वेळ कुठेय? ‘माझ्याकडे सारं काही असायला हवं’, इतरांच्या वाट्याचंही हिसकावून, ओरबाडून घेण्यातही आसुरी आनंद मिळवणारी मोठी जमात असते सभोवती. पण गरीब बापड्यांना अन्नधान्यदान करणारे, शिधा देणारे, आर्थिक हात देणारे सर्वधर्मीय बघते तेव्हा सारे रंग क्षणात नष्ट होऊन ‘माणूसपणाचा’ एकमेव रंग मला माझ्या मातीत दिसू लागतो.
कुण्या महापुरुषाने सांगितलेलं आहेच नं ” Life is full of surprises and challanges.” किती यथार्थ आहे नं! जगण्याच्या वाटेवर कुठल्या वळणावर अपघात होईल आणि नेमके कोणते अपघाती वळण असेल? याचा थांगपत्ता कुणालाही कधी नसतो मग तो गरीब असो वा श्रीमंत.
सारी उजळणी होऊ लागते…किती कुणाशी
भांडलो-तंडलो?, कुणाच्या फजितीवर हसलो?, कुणाला नकळत दुखावलं?, तेव्हा ‘हे’ करायला हवं होतं, ‘तो’ निर्णय तेव्हा चुकीचा होता. ‘मी त्यावेळी त्याला-तिला असं बोलायला नको होतं किंवा त्याचवेळी शाब्दिक चपराक द्यायला हवी होती’ असे नाना विचार डोक्यात गर्दी करतात हल्ली. ज्या-ज्या साहित्यिक मित्र-मैत्रिणींच्या पुस्तकांवर लिहिण्याची आश्वासनं दिली होती ती पूर्ण करतेय हल्ली घरात बसून. दिलेला शब्द राहून जायला नको, कारण जगणं किती बेभरवशाचं आणि अनिश्चित आहे हे खूप जवळून बघतेय.
रडीचिडीचे डाव आयुष्यात खेळण्यापेक्षा इमानी भाव ठेऊन जगणे कायमच समाधान देते, आपण असताना आणि नसतानाही!
या संचारबंदीच्या काळात बरीच जवळची ज्येष्ठ माणसं अनंताच्या प्रवासाला गेली. त्यांना शेवटचा निरोप द्यायला वा स्नेह्यांच्या सांत्वनासही जाऊ न शकल्याचे शल्य टोचतंय उरात, पण काळ असाही बांधून ठेवू शकतो आपल्याला… ही काळाची क्षमताही समजलीय या निमित्ताने. मनाची तयारी करून घेतोय हा काळ कारण कदाचित येत्या काळात पुढ्यात आणखीही येतील अनाम क्षण पडझडीचे… ‘आनेवाला पल’ बेईमानच कारण…. सारेच प्रवासी घडीचे! हल्ली विचारचक्र पूर्वीपेक्षा कैक पटीने वेगाने फिरायला लागले आहे. कारण दाहीदिशांनी माहिती येऊन धडकतेय मनमेंदूवर! घरात सुखेनैव बसून दूरचित्रवाणीवर बघते, शेकडो मैल शहरातून गावाकडे चालत जाणारे अगतिक मजूर. वाहने नाहीत आणि जगण्याची हमीही नाही म्हणून मोलमजुरी करणारे हजारो कामगार, त्यांची फरफट बघते आणि जीव हेलावतो. कुठला सूक्ष्म विषाणू यांना खाणार नाही, तर हे त्यांचं रात्रंदिवस उपाशीपोटी चालणंच त्यांना संपवणार असं वाटून जातं. त्यातही त्या बापाच्या खांद्यावर विसावलेलं दीड-दोन वर्षांचं लेकरू अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी डुलक्या घेतंय, स्वप्नात त्याचं गाव-घर तर दिसत नसेल नं त्याला??? बाप पाय ओढतोय, आईच्या पाठीवर, डोक्यावर फाटक्या संसाराची बोचकी बसलेली, त्या माऊलीलाही सहन होत नसतेच ही सारी फरफट, पण हा देश त्यांना कधीच कुठल्या हिशेबात धरतच नसतो. ते नेहमीच वजा आहेत, नगण्य ठरले आहेत या देशासाठी. शेकडो मैल चालून आल्यावर त्यांचे गाव, तेथील सत्ता पुन्हा अस्पृश्यतेची अमानवी वागणूक देते. चौकात बसवून रसायनमिश्रित फवारणीने त्यांच्या चिल्यापिल्यांचे सामानासह स्वागत होते. डोळे रसायनामुळे चुरचुरू लागतात. लेकरं वेदनेने किंचाळतात-ओरडतात, पण ठार बहिऱ्या सत्तेला त्यांचा आवाज नेहमीप्रमाणे आताही ऐकू गेलेला नसतोच.
285 कि.मी.दूर असलेल्या गावी शहरातून घरी निघालेला तरुण कामगार. दोन दिवस सतत चालत राहतो आणि अतिश्रम-थकवा आणि मानसिक ताण यामुळे 85 कि.मी. वर आपले गाव असताना एकाएकी कोसळतो. संचारबंदीची शांतता असते चौफेर. मदतही तातडीने कुठे व कशी मिळणार? सत्ता, संपत्ती असणाऱ्यांसाठी धावाधाव करणारे असतात अनेक, पण हा ‘मजूर’ वर्गातील असल्याने कोण त्याच्यासाठी धावून येणार? ह्रदयविकाराच्या झटक्याने तो प्राण सोडतो… डोळे मिटतानाही त्याच्या डोळ्यात त्याचे गाव आणि घरच असेल नाही? जे डोळे मिटतानाही तो पाहू शकला नाही…! अशावेळी घराकडे आणि घरातल्या माझ्या प्राणप्रिय चेहऱ्यांकडे बघत माझ्या अफाट सुखाची जाणीव मला प्रकर्षाने होते आणि पुन्हा प्रश्न पडतो ‘सारं काही इथंच असताना कोणत्या सुखामागे धावत असतो बरं आपण सतत?’ हा धडाही ह्याच संचारबंदीच्या काळाने दिलाय. आयुष्यात भौतिक सुविधा ह्या नेहमीच दुय्यम असाव्यात आणि ‘माणसं’ ही प्राथमिकता असावी, पण आपलं सारं उलट चाललंय. हा गडद काळा काळ ओसरला की, बऱ्याच लोकांना ‘बोनस’ आयुष्याची किंमत कळेल असे वाटू लागलेय!
शासनाने थोडा उशिरा का होईना ह्या बापड्या जीवांचा विचार करून त्यांच्या जेवणाची, निवासाची व्यवस्था केलीय. तिथे चार दिवस सतत पायी वाट तुडवत मुंबईहून बिहारकडे निघालेला मजूर पोहचतो. अर्धमेला झालेला तो जीव जेवायला बसतो पण जेवण्याऐवजी तो ढसाढसा रडू लागतो, ताटातले पदार्थही दिसत नाहीत त्याला अश्रुंमुळे. उन्हातान्हात तुडवलेली ती भयंकर वाट आणि चार दिवस झालेली उपासमार तो कधीच विसरू शकणार नाहीये आयुष्यात. तिथले अधिकारी विचारपूस करतात, त्याला शांत करतात तेव्हा तो म्हणतो, ”रोने दो साब, जी भरके, चार दिन बाद घरका खाना देख रहे है…वह भी इतना सारा|” त्याचे हे वाक्य ऐकून काळजाला कितीतरी घरं पडली. नेमकी ही बातमी पाहताना आम्ही सर्व जेवत होतो. मुलांकडे एक कटाक्ष टाकला, त्यांना जे समजायचे ते समजले. न आवडणारी भाजी असली की उगाच चिडचिड करतो आपण? वा आवडता पर्याय शोधून जिभेचे चोचले पुरवतो. पण यापुढे माझ्या तरी कुटुंबात जे ताटात आलंय ते आवडीने खाल्लं जाईल ही खात्री वाटतेय. हेही हा काळ शिकवतोय. परवा फेसबुकवर चमचमीत पाककृती बनवण्याची ध्वनीचित्रफीत टाकली होती. हा जेवण बघून रडणारा मजूर बघून माझे मलाच वैषम्य वाटू लागलेय….!
अनेक उत्तम ग्रंथ वाचलेत पण सध्या हा काळ जे जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवतोय न ते कुठल्याच ग्रंथात सापडणार नाही हे मात्र नक्की. स्वतःला अचूक वाचणं जमलंय का आपल्याला ? वेग आणि यशाचं समीकरण मांडताना विरामातही हित असतं ही जाणीव ह्या जीवघेण्या विषाणूने करून दिलीय. देशावर, भारतीयांवर कितीही मोठे संकट येवो, नेहमीप्रमाणे ‘माणुसकी’ गहाण ठेवत आपले ‘पक्षीय अजेंडे’ राबवत असणारे चेहरेही उघडे पडताय. इतके दिवस ह्या विषाणूला धर्म नव्हता आता मात्र त्याला ‘धर्म’ देऊ पाहणारे, जातीय-धार्मिक द्वेष नेहमीप्रमाणे या कठीण काळातही पसरवणारे जीव ‘कोरोना’पेक्षा अधिक विषारी वाटू लागलेत.
ही सारी संकटं दूर होवोत! सुख, शांतता ह्या माझ्या प्रिय भारतात नांदो, इथला एकही जीव उपाशीपोटी ना निजो…. एवढीच प्रार्थना त्या निर्मिकाकडे-निसर्गाकडे आणि इथल्या ‘काही’ विखारी वृत्तींकडे सुद्धा….!
———————–
*प्रा.डॉ.प्रतिभा जाधव*