नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पट्टयात डोंगररांगात आणि आजूबाजूला जंगल झाडीच्या साहायाने टिकून असलेली जैवविविधता आता हळूहळू नष्ट होत आहे. या भागातील आदिवासी आणि निसर्गप्रेमींसाठी जणू वरदान ठरलेली वनसंपदा डोळ्यांदेखत भुईसपाट होतांना पाहणे जीवावर येत आहे. जेव्हा राजरोषपणे घावावर घाव पडून गगनभेदी वृक्ष भुईसपाट होत असून ट्रकच्या साहाय्याने वृक्षाची अवैध वाहतूक होत आहे.
एकीकडे दरवर्षी लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण करीत आहोत अन दुसरीकडे याच वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्र्यंबक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा लाभलेली आहे. येथील नांदगाव कोहली, वेळुंजे, खरवळ, तोरंगण आदी परिसरात वृक्षतोड होताना दिसून येते अशावेळी स्थानिक वनकर्मचारी हातावर हात धरून बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ,1958 च्या प्रकरण ३ अ,कलम 54अ (ओ) आणि पेसा कायद्यानुसार झाडे पाडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत शिफारस करणे हा ग्रामसभेचा अधिकार आहे . ग्रामसभेने बहुमताने केलेली शिफारस संबंधीत अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्यावर बंधनकारक आहे. तसेच आदिवासी मालकीतील झाडे तोडणे म्हणजे या सर्व कायद्याचे उल्लंघन करीत संबंधित ठेकेदार लूट करीत आहेत. जल, जंगल, जमीन या बाबत सतत जपणूक आणि संवर्धनाचे संदेश देणारे शासन, राजकारणी व अधिकारी यांनी या अगोदरच जनतेच्या डोळ्याची तपासणी केल्याचे दिसते. अर्थात शासन, अधिकारी सांगतील तशी जनता पाहते.
जंगल कुठलेही असो या साठी शासनाने सर्वाना नियम अटी शर्ती कायदे केलेले आहेत. मग यात सरळ सरळ संविधानाची मोड तोड करून नैसर्गिक साधन संपत्तीची लूट ही भविष्यात समाजाच्या जीवावर उठेल याचा शंका नाही. येथील नागरिक पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असून शेतीपासून पुरेसे उत्पन्न मिळत नसले तरी पूर्वजांपासून आलेला शेतीचा वारसा जपला जात आहे. वनसंवर्धन करण्यावर येथील जनता भर देत असते. परंतु काही लोक याच लोकांचा आधार घेत वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाते.
आंबा, मोह, साग, सादडा, हेद, शिरीष, दांडोस, धामोडा, पळस, शिसव, खैर, पेटार, आळीव आदी कितीतरी नानाविध झाडाचं लेणं अंगावर घेऊन सजलेल्या या सुंदर शिवाराला नजर लागली आणि इथली अनेक पिढ्या पाहिलेली झाडी तुटू लागली. ही तुटलेली झाडे पाहिली की कुणाही संवेदनशील व पर्यावरणप्रेमी माणसाचाही जीव तुटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेत चळवळी करणाऱ्या संघटना, संस्था आदींनी सहभाग घेऊन निसर्गसंपदा व पर्यावरण वाचविण्याचा विषय अग्रभागी घेतला पाहिजे. वृक्षसंवर्धन ही काळाची फार मोठी गरज निर्माण झाली आहे.
– देवचंद महाले