मुंबई : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच काम करत असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सय्यम ठेवावा येत्या १५ मार्चपर्यंत कांदा निर्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खासदार डॉ. भारती पवार यांना दिले.
दरम्यान केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवल्याचे जाहीर केले परंतु या संदर्भात अध्यादेश जारी न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. कांद्याचे दर हे कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला असताना खासदार डॉ.भारती पवार यांनी तातडीने दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री मा.पियूष गोयल यांनी भेट घेतली. सदर भेटी प्रसंगी केंद्रीय वाणिज्य मंत्री महोदयांनी कांदा निर्यात सुरू करणेकामी नोटिफिकेशन लवकरच लागू केले जाईल, व येत्या १५ मार्च २०२० पर्यंत कांदा निर्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.भारती पवार यांना दिले.
दरम्यान कांदा निर्यात सुरू करण्यासाठी जिल्ह्यात आंदोलन सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांनी पियुष गोयल यांची भेट घेत याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कांदा पीक उत्पादन झाले आहे, शिवाय अवकाळी पावसाचेही संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण शेतकऱ्यांची काळजी घ्यावी असे निवेदन दिले.
यांनतर मंत्री पियुष गोयल यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करून लवकरात लवकर नोटिफिकेशन काढण्याचे आदेश केले आहे.