Saturday, May 4, 2024
Homeनाशिकलॉक डाऊनच्या काळात नागरिक घेताय समुपदेशकांची मदत; सगळ्या हेल्पलाइन्स ‘ बिझी ‘

लॉक डाऊनच्या काळात नागरिक घेताय समुपदेशकांची मदत; सगळ्या हेल्पलाइन्स ‘ बिझी ‘

नाशिक : कोरोनामुळे देश लॉकडाऊन आहे. तो कालावधी ३ मे पर्यंत वाढवला आहे. या सगळ्या अनिश्चिततेची लोकांना भीती वाटायला लागली आहे. हेल्पलाइन्सवर फोन करून मदत मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सगळ्या हेल्पलाइन्स बिझी झाल्या आहेत. सल्ला मागणाऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागत आहे.

शासनाने अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने लोकांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाइन्स सुरु केल्या आहेत. मुंबई महापालिका आणि बिर्ला यांची संयुक्त सेवा, प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला संस्था, राज्य महिला आयोग, चाईल्ड हेल्पलाईन, पोद्दार फाऊंडेशन व अन्य अनेक सामाजिक संस्थांनी व नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर अनेक समुपदेशकांनी हेल्पलाईन सुरु केल्या आहेत.

- Advertisement -

या सर्व हेल्पलाइन्सच्या समुपदेशकांशी व राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथ्रा यांच्याशी संवाद साधला असता सर्वानी समुपदेशनाचे काम खूप वाढल्याचे सांगितले. या संस्थांना मदतीसाठी रोज साधारणतः १० ते १०० फोन यायला लागले आहेत. दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तर काही संस्थांना एका दिवसात १२५ पेक्षा जास्त फोन आले होते.
राज्यातील निर्बंध काही प्रमाणात सैल केले गेले असले तरी समाजात अनिश्चितता आहे.

त्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढत आहे. अनेक प्रश्नांमुळे आणि उद्याच्या भीतीने माणसे भयग्रस्त झाली आहेत. सुरुवातीला लोकांना आपल्याला करोनाची लागण होईल का? आपल्याला मरण येईल का? असे प्रश्न पडले होते. पण जसजसा लॉकडाऊन वाढत आहेत तसतसे प्रश्नांचे स्वरूप बदलत आहे. आपली नोकरी टिकेल का? अजून किती दिवस घरून काम करावे लागेल? माझे व माझ्या कुटुंबाचे काय होईल? आपली कंपनी पुन्हा सुरु होईल का नाही? पगार कमी होईल का? हे प्रश्न माणसांना सतावत आहेत.

अस्वस्थ विद्यार्थ्यांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक परीक्षा रद्द होत आहेत. स्पर्धा परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालये कधी सुरु होतील? वडिलांची नोकरी जाईल का? तसे झाले तर आपल्या शिक्षणाचे कसे होणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत.
महिलाही अशाच अनेक प्रश्नांनी भयग्रस्त आहेत. या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. घरच्यांची नोकरी गेली तर प्रपंचाचा गाडा कसा ओढायचा हा प्रश्न बहुतेक महिलांना पडला आहे.

मुले सूचनांना कंटाळली आहेत
मुले मोठया संख्येने फोन करत आहेत. १ ते १४ एप्रिल दरम्यान आम्हाला ४५-५० मुलांचे कॉल आले. मुले घरी बसायला कंटाळली आहेत. आम्ही घरच्यांच्या सूचनांना कंटाळलो आहोत असे काही मुलांनी सांगितले तर काही मुलांनी घरी मारहाण होत असल्याची, पालक सारखे रागावत असल्याची तक्रार केली. नाशिकमधील एका चौदा पंधरा वर्षाच्या मुलाने घर सोडले आहे. समुपदेशननंतरही त्याला घरी जायचे नाही. संस्थेने शासनाच्या मदतीने त्याची सोय केली आहे.
प्रवीण आहेर, चाईल्ड हेल्पलाईन केंद्र समन्व्यक.

कौशल्ये विसरून जाण्याची भीती
या दरम्यान माणसांच्या स्वभावाची दोन टोके अनुभवाला येत आहेत. काही माणसांना मदत हवी आहे तर काही माणसे गरजूना मदत करायला तयार आहेत. अनेक माणसांना अंगी असलेली कौशल्ये विसरून जाण्याची भीती सतावते आहे.
डॉ. शैलेंद्र गायकवाड

दहावी बारावीची मुले फोन करतात
दहावी आणि बारावीची मुले मोठ्या संख्येने फोन करतात. शिक्षणक्षेत्रातील अस्थिरतेचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. मानसिक दबाव वाढत आहे.
मलिका, पोद्दार फाऊंडेशन

महिलांनी आमच्याशी बोलावे
या अनिश्चित काळाचा महिलांवर जास्त ताण आला आहे. कुटुंबाचे भविष्य त्यांना सतावते आहे. मुलांच्या शिक्षणाचीही भीती त्यांना वाटते आहे. महिलांनी ताण घेऊ नये. त्यांनी आमच्याशी बोलावे. आम्ही त्यांना मदत करत आहोत.
आस्था लुथ्रा, सदस्य सचिव, राज्य महिला आयोग
हेल्पलाइन्स
चाईल्ड हेल्पलाईन – १०९८
राज्य महिला आयोग व पोद्दार फाऊंडेशन – १८००१२१०९८०
मुंबई महापालिका – १८००१२०८२००५०
प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला – १८००१०२४०४०

- Advertisment -

ताज्या बातम्या