नाशिक । गोकुळ पवार : जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. यापैकी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यात भात, नाचणी आणि वरई ही प्रमुख पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. तसेच या भागातील पारंपरिक पीक म्हणून नागलीकडे पाहिले जाते. परंतु अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक पिकांकडे वळत नागलीच्या शेतीकडे पाठ फिरवली आहे.
जिल्ह्यातील हे आदिवासी तालुके एकेकाळी नागली उत्पन्नामध्ये अग्रेसर होते. परंतु काही वर्षांपासून नवीन आधुनिक तंत्र शेतीमध्ये आल्याने पारंपरिक नागली शेतीकडे शेतकरी वळत नाहीत, परिणामी पारंपरिक पीक असलेल्या नागलीचे उत्पादन घटले आहे. तसेच या भागात नागलीनंतर भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर सद्यस्थितीला टोमॅटो, गहू, फ्लॉवर, कोबी, काकडी अशा अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळल्याने साहजिकच नागली पीक मागे पडले. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर पिकांतून अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कलआधुनिक शेतीकडे वाढला आहे.
नुकताच कृषी विभागाच्या २०१९-२०च्या खरीप हंगाम पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात ९ हजार ५७१ हेक्टरवर नागली व वरई या पिकाची पेरणी करण्यात आली. यामध्ये कृषी कार्यालयात या पिकाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसून नागली आणि वरई अशा दोन पिकांची माहिती दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील या भागात प्रमुख पिक असलेल्या नागलीला आता प्रमुख पिकांच्या यादीतून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे नागली पीकच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
मागील पाच वर्षांच्या तुलनेत नाचणी लागवडीचे क्षेत्र फारच घटले आहे. याउलट भातशेतीबरोबर इतर पिकांचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. साधारण नागलीचे पीक डोंगर उतारावर घेतले जाते. परिणामी यासाठी मनुष्यबळ, वेळ, मेहनत अधिक घ्यावी लागते. त्यामुळे डोंगर शेती प्रक्रियेकडे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अधिक मेहनत आणि उत्पादन कमी यामुळे नागली पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते आहे.
नागली पिकाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे उत्पादनांत घट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळल्याने तसेच भात क्षेत्र वाढल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
-संदीप वळवी, कृषी अधिकारी, त्र्यंबकेश्वर
नागली पिकासाठी अधिक माणसाची आवश्यकता असते, वेळ द्यावा लागतो. परिणामी इतर पिकांवर अधिक वेळ दिल्याने उत्पादनात वाढही झाली अन पैसेही मिळाले. परिणामी नागली पिकाकडे दुर्लक्ष होत गेले.
-तानाजी महाले, शेतकरी