देवळा : वाजगाव येथील गोटू देवरे यांनी ३० क्विंटल गहू केला गरजूंना वाटप
वाजगाव : सध्याच्या लॉकडाऊन मुळे मोलमुजरी करणाऱ्या नागरिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्यासाठी येथील कांदा व्यापारी गोटु देवरे यांनी प्रत्येक कुटुंबाला सात किलो गहू वाटप केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून, यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. शेतीचीही कामे ठप्प झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मजूर वर्गाच्या हाताला काम नसल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले.
गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मजुरांचे कुटुंबांची उपासमारी होऊनये म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत येथील बालाजी अँड कंपनीचे संचालक भगवान (गोटु) देवरे जवळपास ३० क्विंटल गहू संपूर्ण गावात, आदिवासी वस्ती, कामदेवमळा आदि ठिकाणच्या गरजूंसाठी प्रत्येक कुटुंबाला ७ किलो प्रमाणे सरसकट वाटप करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
गोटू देवरे यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल वाजगासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी त्यांचे बंधू धनंजय देवरे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापू देवरे, देवळा शेतकरी संघाचे व्हा.चेअरमन संजय गायकवाड, माजी उपसरपंच अमोल देवरे, डॉ निशिकांत देवरे, शैलेंद्र देवरे, आत्माराम देवरे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे नागरिकांना घराबाहेर जाणे अवघड झाले, तर मजुर, गरीब व गरजू कुटुंबाना उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी मदत करण्यात आली. शासनाने लॉकडाऊन वाढवल्यास कंपनीच्या वतीने पुन्हा धान्याचे वाटप केले जाईल.
-भगवान देवरे , बालाजी कंपनी, संचालक
सध्या मजुरीची कामे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. देवरे यांनी गरजू कुटुंबांना धान्य वाटप केल्याने मदत झाली आहे.
-सुमन खैरणार मजूर, वाजगाव