नाशिक । जिल्ह्यात रात्री घरफोड्या करून पसार होणार्या आंतरराज्य टोळीला ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातच्या दुर्गम भागातून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून जिल्हयातील 7 घरफोड्या उघडकीस आल्या असून त्यांच्याकडून 4 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या टोळीचा सुत्रधार कांती तेरसिंग भाभोर (रा सर्व खुजरीया जि. दाहोद, गुजरात), नानु आगतराव मंडले (27, रा. सहकारनगर, जि. दाहोद, गुजरात) व मांदो उर्फ वकिल तेरसिंग भाभोर (रा. खजुरीया, ता. गरबाडा, जि. दाहोद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे साथीदार देवला जोरीया भाभोर, विनु तेरसिंग भाभोर (रा सर्व खुजरीया जि. दाहोद, गुजरात) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
जिल्ह्यातील सटाणा शहर व परिसरात घरफोड्या तसेच दरोड्या सारख्या घटना सातत्याने घडल्याने यातील आरोपींना अटक करण्याचे आदेश जिल्ह्याच्या अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संमांतर तपास सुुरू केला होता.
घरफोडीच्या घटनातील सीसीटिव्ही पाहिल्यानंतर चोरटे हे परराज्यातील असल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणानंतर सर्व चोरटे गुजरात – मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील असल्याचे समोर आले. तसेच खबर्यांकडूनही याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक स्वप्नील राजपुत, कर्मचारी रविंद्र वानखेडे, दिपक आहिरे, अमोल घुगे, निलेश कातकाडे, हेमंत गिलबिले, गिरीष बागुल यांच्या पथकाने गुजरात राज्यातील दुर्गम अशा दोहादा गाठले.
येथील दुर्गम भागात तीन दिवस मुक्काम ठोकून संशयितांवर पाळत ठेवून या पथकाने संशयितांना जेरबंद केले. त्यांना अटक करताच त्यांनी जिल्ह्यात केलेल्या घरफोडींची कबुली दिली. तसेच त्यांचे इतर दोन साथीदारांच्या मदतीने या चोर्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या चौकशीत जिल्ह्यातील सटाणा पोलीस ठाण्यातील 6 व वावी पोलीस ठाण्याकडील एका घरफोडीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील 10 तोळे सोने, 250 ग्रॅम चांदी असा 3 लाख 92 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या टोळीने नाशिक जिल्ह्यासह राज्यातील धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली या जिल्ह्यांध्येही घरफोड्या केल्याचे समोर येत आहे. यासह अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.
सुत्रधारावर 37 गुन्हे
या टोळीचा मुख्य सुत्रधार कांती तेरसिंग भाभोर (रा सर्व खुजरीया जि. दाहोद, गुजरात) हा अट्टल दरोडेखोर असून त्यावर गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 37 गुन्हे दाखल आहेत. त्यांची टोळी देवदर्शनासाठी म्हणून महाराष्ट्रात येऊन दिवसा टेहळणी करायची तर रात्री हात साफ करून रातोरात गुजरात गाठत असे.