Friday, May 3, 2024
Homeनाशिकउद्यापासून ‘शिवभोजन’चा आस्वाद मिळणार; पालकमंत्रांच्या हस्ते उद्घाटन

उद्यापासून ‘शिवभोजन’चा आस्वाद मिळणार; पालकमंत्रांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक । गोरगरिबांना अल्प दरात जेवण मिळावे यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा रविवार (दि.26) पासून शुभारंभ होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ हे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्राचे उद्घाटन करणार आहे. त्यात ‘शिवथाळी’नावाच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये फोटो काढला जाणार आहे. त्यानंतर कुपन जनरेट होताच 10 रुपये घेऊन त्या व्यक्तीला लिमिटेड थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. शहरात चार व मालेगावमध्ये एका ठिकाणी ही थाळी मिळणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्तेत आल्यास गोरगरिबांसाठी दहा रुपयात जेवण थाळी उपलब्ध करून देऊ असे जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. राज्यात शिवसेना व दोन्ही काँग्रेसची सत्ता आल्यावर कॉमन मिनिमम प्रोगॉममध्ये शिवभोजन थाळी योजनेचा समावेश केला होता. त्यानुसार येत्या 26 जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात शिवभोजन थाळी सुरू होणार आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे कँटिन, पंचवटीतील बाजार समितीतील बळीराजा रेस्टॉरंट व नाशिकरोड रेल्वे स्थानक बाहेरील दीपक रेस्टॉरंट या तीन ठिकाणाची शिवभोजन थाळीसाठी निवड करण्यात आली आहे; तर मालेगावला बाजार समितीत ही थाळी उपलब्ध करुन देण्यात येईल प्रत्येक केंद्राला दिवसाला दीडशे थाळीची मर्यादा देण्यात आली आहे. ही थाळी चाळीस रुपयाला असून सर्वसामान्यांना दहा रुपयात उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक थाळीमागे 30 रुपयाचे अनुदान राज्य शासन देईल.

दुपारी 12 ते 2 या वेळेत उपलब्ध
थाळीत पोळी, भाजी, वरण, भात आदीचा समावेश असेल. दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्वसामान्यांना शिवथाळीचा लाभ घेता येईल.पण या थाळीचा लाभ घेण्यासाठी त्या लाभार्थ्याचा फोटो संबंधित हॉटेल मालकाच्या मोबाईल अ‍ॅप मध्ये काढला जाणार आहे. शिवथाळी नावाचे हे अ‍ॅप हॉटेल मालकाला डाउनलोड करावे लागणार आहे. त्यात लाभार्थीचा फोटो, नाव,पत्ता आदी माहिती असणार आहे. यात आधार कार्ड ची सक्ती नसली तरी जेवणा आगोदर फोटो काढला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या