लासलगांव : अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनाचे गणित विस्कटले आहे. नाशिक जिल्हा निर्यातक्षम द्राक्ष साठी प्रख्यात आहे.मात्र अवकाळी मुळे द्राक्ष निर्यात उशीराने सुरुवात झाली असून अद्याप पर्यंत २० हजार ८०० मैट्रिक टन द्राक्ष निर्यात झाले असून २०५ कोटी रूपयांचा व्यवसाय झाला आहे.
आपल्या चवीने देशासह परदेशातील नागरिकांना भुरळ पाडणारी नाशिकची द्राक्षे लांबलेला पाऊस आणि अवकाळी मुळे द्राक्ष निर्यात उशीराने सुरु झाली आहे.दिवाळीत झालेल्या पावसाने मोठ्या प्रमानात द्राक्ष बागांचे नुकसान झाले.हंगामपूर्व द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली. तर वेगवेगळ्या टप्प्यात असणाऱ्या बागांनाही झळ सहन करावी लागली. केवडा, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने काहींना बागा सोडून द्याव्या लागल्या. या सर्वाचा परिणाम द्राक्ष हंगामावर दिसत आहे.
द्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे.सन २०१८-१९ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २३३५ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. या हंगामात द्राक्ष बागा परतीच्या आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली असताना हे नवीन संकट उभे ठाकले आहे. कृषिमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्ष-मण्यांचा आकार, द्राक्ष-घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचे अंश आदींवर आधारित काही निकष आहेत. या निकषांचे पालन करीत भारतीय द्राक्षांनी युरोपीय देशांत आपली ओळख निर्माण केली.
नाशिक जिल्ह्यांमधून रशिया, दुबई, बांगलादेश, मलेशिया या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होत असते.या हंगामात देशातून ४३ हजार ३५२ मैट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून त्यातून 371 कोटी रुपयांचे परकीय चलन हे देशाला मिळालेले असून नाशिक जिल्ह्यतून २० हजार ८०० मैट्रिक टन द्राक्ष निर्यात झाले असून २०५ कोटि रूपयांचा व्यवसाय झाला आहे.