Sunday, November 17, 2024
Homeनगरनेवाशाच्या नगराध्यक्षपदी ‘क्रांतिकारी’च्या पिंपळे तर उपनगराध्यक्षपदी पाटील

नेवाशाच्या नगराध्यक्षपदी ‘क्रांतिकारी’च्या पिंपळे तर उपनगराध्यक्षपदी पाटील

फिरोजबी पठाण यांनी केले मतदान; क्रांतिकारीच्या उमेदवारांना 9 तर विरोधी उमेदवारांना पडली 7 मते

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या योगिता सतीश पिंपळे तर उपनगराध्यक्षपदी नंदकुमार लक्ष्मणराव पाटील हे दोन मतांनी विजयी झाले. योगिता पिंपळे यांनी नगरपंचायत विकास आघाडीच्या काँग्रेस नगरसेविका शालिनी सुखधान यांचा पराभव केला. तर उपनगराध्यक्ष पदासाठी नंदकुमार पाटील यांनी भाजपचे रणजित सोनवणे यांचा पराभव केला. सदस्यत्व पात्र असल्याचा निर्णय आलेल्या फिरोजबी पठाण यांनीही मतदान केले.

- Advertisement -

नगरपंचायत कार्यालयात उर्वरीत अडीच वर्षाच्या काळासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. सकाळी 10 ते 12 दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी क्रांतिकारीकडून नंदकुमार पाटील व भाजपकडून रणजित सोनवणे व सीमा मापारी यांनी अर्ज दाखल केले. मापारी यांनी माघार घेतल्याने पाटील व सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली तर नगराध्यक्ष पदासाठी सौ. पिंपळे व सौ. सुखधान यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले.

यामध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नऊ नगरसेवक व भाजप-काँग्रेस गटाचे सात नगरसेवक उपस्थित होते. तर भाजपच्या गटातील अपक्ष नगरसेविका अनिता डोकडे उपनगराध्यक्ष पदासाठी रणजित सोनवणे यांना अनुमोदक असताना अनुपस्थित राहिल्याने क्रांतिकारीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता पिंपळे यांना 9 तर शालिनी सुखधान यांना 7 मते मिळाली. त्यानंतर झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीतही ‘क्रांतिकारी’च्या पाटील यांना 9 तर सोनवणे यांना 7 मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

यावेळी क्रांतिकारीचे गटनेते लक्ष्मण जगताप, अर्चना कुर्‍हे, सचिन वडागळे, फारुक आतार, फिरोजबी पठाण, अंबिका इरले, संदीप बेहळे, अ‍ॅड. बापूसाहेब गायके तर मावळत्या नगराध्यक्षा संगीता बर्डे, भाजपचे गटनेते सचिन नागपुरे, दिनेश व्यवहारे, सीमा मापारी, डॉ. निर्मला सांगळे, सुनील वाघ उपस्थित होते.

नगराध्यक्षा योगिता पिंपळे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा युवानेते प्रशांत गडाख यांनी सत्कार केला. निवडीनंतर नगरपंचायत चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी सुनील धायजे, अजय शिंदे, महंमद शेख, शिवा राजगीरे, विशाल सुरडे, अभिजित गाडेकर, बाळासाहेब मारकळी, सुनिल जाधव यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेणार – आ. गडाख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांचे तालुक्याच्या विविध प्रश्नासाठी विशेष सहकार्य मिळत असून नेवासा शहराच्या विविध प्रश्नांसाठी एक शिष्टमंडळ लवकरच त्यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार आहे. नेवासा नगर पंचायतमध्ये मोठा सावळागोंधळ सुरू असून ‘क्रांतिकारी’च्या नगरसेवकांनी आपली नेहमीची कार्यपद्धती बदलून सामान्य लोकांत जाऊन जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य द्यावे.

पोटनिवडणूक रद्द
नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग क्र. 13 च्या नगरसेविका फिरोजाबी पठाण यांचे सदस्य पद नगरविकास मंत्रालयाने पात्र ठेवल्याने प्रभाग क्रमांक 13 ची पोटनिवडणूक रद्द ठरविण्यात येत आहे.
– समीर शेख, मुख्याधिकारी

भ्रष्टाचारी राजवटीचा अंत
‘पाहुण्या ठेकेदाराला’ मोकळे रान सोडल्याने गेल्या अडीच वर्षांत शहरातील जनतेला गढूळ पाणी मिळाले. शहराची पाणी योजना, घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांना अंधारात ठेवून घेतलेली जागा यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने याची चौकशी केली जाणार आहे. नेवासा नागरपंचायतीतील भ्रष्टाचारी राजवटीचा व पीए राजचा आता अंत झाला असून जनतेच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल.
– उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील

भाजप-काँग्रेस युती
नेवासा नगर पंचायत मध्ये भाजपचे 6, काँग्रेसचा एक व अपक्ष 1 नगरसेवक, असे बलाबल होते. त्यांनी नगर पंचायत विकास आघाडी या नावाने गट नोंदणी केली होती. भाजपचे 6 सदस्य असताना त्यांनी 1 नगरसेवक असलेल्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

2017 ते 2019 या काळात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा शहरासाठी नगरविकास अंतर्गत आणलेल्या निधीतील पाणी योजना, प्रशासकीय इमारतसह उर्वरीत कामे लवकर पूर्ण करून घ्यावीत आणि विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी यापुढील काळात नगरविकास माध्यमातून शहर विकासासाठी निधी आणून विकासकामे करावीत.
– सौ. शालिनी सुखधान, नगरसेविका

आमदार शंकरराव गडाख व सौ. सुनीताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत गडाख यांच्या शहर विकासाच्या व्हिजननुसार काम करून शहराचा सर्वांगीण विकास करणार.
– सौ. योगिता पिंपळे, नगराध्यक्षा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या