Saturday, July 27, 2024
Homeनगरनिळवंडेतून शिर्डी- कोपरगाव बंदिस्त पाणीपुरवठ्याला परवानगी – सौ. कोल्हे

निळवंडेतून शिर्डी- कोपरगाव बंदिस्त पाणीपुरवठ्याला परवानगी – सौ. कोल्हे

कोपरगाव (प्रतिनिधी)- निळवंडे धरणातून प्रस्तावित शिर्डी, कोपरगाव बंदीस्त पाईपलाईन योजनेला औरंगाबाद खंडपीठाने हिरवा कंदील दिला आहे. या योजनेचे सर्व अडथळे दूर झाले असून कोपरगाव शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करणार्‍या विरोधकांना चपराक असून आपली आमदारकी सार्थकी लागल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निळवंडे- शिर्डी- कोपरगाव ही बंदीस्त पाईपालाईन मंजूर करून घेतली होती. या योजनेचे फेज 1 चे काम शिर्डी शहरात सुरू झाले होते. मात्र या पाईपलाईन विरोधात निळवंडे लाभधारक शेतकर्‍यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून सदर योजनेच्या कामाला स्थगिती मिळविली होती.

- Advertisement -

न्यायालयात या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्या. अविनाश घारोटे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यात निळवंडे धरणातील 15 टक्के पिण्याच्या पाण्याच्या आरक्षित साठ्यातून शिर्डी, कोपरगावला पाणी देण्यास हरकत नसल्याचे सांगत न्यायालयाने या बंदिस्त पाईपलाईन योजनेला हिरवा कंदिल दिला.

याबाबत माहिती देताना माजी आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, निळवंडे धणातून बंदिस्त पाईपलाईव्दारे कोपरगाव शहराला शुध्द पाणी मिळणार आहे. यासाठी मी या योजनेचा पाठपुरावा केला. अनेकांनी या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या तालुक्यांतील नेत्यांबरोबरच तालुक्यातील परंपरागत विरोधकांसह शहरातील झारीतील शुक्राचार्यांनी कोर्टात हा संघर्ष नेला. शेतकर्‍यांमध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केले. शहरातील जनतेला चुकीची माहिती देऊन माझ्याविरोधात असंतोष पसरविण्याचे काम केले. मात्र माझी भूमिका प्रामाणिक होती. शहरातील महिलांना शुध्द पाणी देण्याचे स्वप्न मी पाहिले होते. यासाठी माझी आमदारकी पणाला लावली.

विरोधकांनी न्यायालयात नेलेल्या या प्रश्‍नाला साईबाबाच न्याय मिळवून देतील अशी मला खात्री होती. आज न्यायालयाने योजनेला दिलेली स्थगिती उठविल्याने माझे शहरातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे हा आनंद आहे. विरोधकांनी माझ्याबद्दल जनतेमध्ये चुकीचा संदेश देऊन राजकारणासाठी माझ्याविरूध्द कटकारस्थान केले. आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने विरोधकांना चागली चपराक बसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाचे नागरिकांनी फटाके फोडून स्वागत केले. शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या जलद कामासाठी बंदिस्त पाईपलाईन कृती समिती स्थापन करण्यात येणार असून भविष्यात योजनेच्या कामात अडथळा आणणार्‍यांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल असे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी सांगितले. यावेळी भाजपचे गटनेते रवींद्र पाठक, पराग संधान, युवा नेते विवेक कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय आढाव, कैलास जाधव, तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे आदीसह भाजप शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

पोहेगाव येथील सभेत आशुतोष काळे यांनी शेतकर्‍यांना सांगितले होते, निळवंडे लाभक्षेत्रातील 11 गावांवर मी अन्याय होऊ देणार नाही. निळवंडेचे पाणी कोपरगावला जाऊ देणार नाही. प्रसंगी शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढू. त्याच्या चित्रफिती आजही उपलब्ध आहे. आज न्यायालयाने बंदिस्त पाणी योजनेस परवानगी दिली आहे. आता विद्यमान आमदारांनी या योजनेबाबद आपली भूमिका जाहीर करावी.

– विवेक कोल्हे, युवा नेते

कोपरगावला पाणी देताना अनेकवेळा माझ्या डोळ्यात पाणी आलं. महिला म्हणून मला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. आरक्षण कोट्यातून पाणी मिळत होते. तरीही शेतकर्‍यांना तुमचे पाणी कमी होते असे सांगून माझ्याविरूध्द भडकविले. त्याचा परिणाम पोहेगाव गटात मला मताधिक्य मिळाले नाही. ज्या शहराच्या भविष्याचा विचार करून पाणी योजना राबविली त्यांनीही साथ दिली नाही. विरोधक अपप्रचार करण्यात यशस्वी ठरले. याची चिंता नाही. शहरवासीयांना पाणी मिळणार आहे. मी मनापासून लढले अन् जिंकलेही याचा मला आनंद आहे.

– स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

- Advertisment -

ताज्या बातम्या