Thursday, November 14, 2024
Homeनगरनिपाणी वडगाव ग्रामपंचायतीचे कामबंद आंदोलन

निपाणी वडगाव ग्रामपंचायतीचे कामबंद आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचार्‍यास मारहाण; गुन्हा दाखल होईपर्यंत कामबंदचा निर्णय

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील निपाणी वडगाव येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी रमेश जाधव यांना घरी येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पाणी का कमी सोडले म्हणून ग्रामपंचायत पदाधिकार्‍याच्या कार्यकर्त्याने मारहाण केली. या संबंधीची माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉ. जीवन सुरुडे व कॉ. श्रीकृष्ण बडाख यांना मिळताच त्यांनी सदर मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध केला. तर मारहाण करणार्‍यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

यावेळी अशोकचे माजी चेअरमन सोपानराव राऊत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मुरलीधर राऊत यांनी सांगितले की, ही घटना निंदनीय असून सदरच्या कर्मचार्‍यास न्याय मिळाला पाहिजे. असे प्रकार गावात खपवून घेणार नाही, कोणत्याही कर्मचार्‍यावर अन्याय होऊ देणार नाही. असे म्हणून कर्मचार्‍याची समजूत काढली. परंतु कर्मचार्‍यांनी जोपर्यंत मारहाण करणार्‍या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या निर्णय घेऊन सरपंच आशिष दौंड यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या व ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाव्या सुपूर्त केल्या.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. कर्मचार्‍यास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष संतोष राऊत, सरपंच आशिष दौंड, रवींद्र पवार, पोलीस पाटील संतोष गायधने, विजय राऊत, कॉ. श्रीकृष्ण बडाख, दीपक राऊत, ज्ञानेश्वर पडोळे, गणेश गायधने, संजय राऊत, दादासाहेब कापसे, अजित राऊत, योगेश जाधव, विठू शिंदे, मारुती गायधने, संतोष तोरस्कर ग्रामपंचायत कर्मचारी भानुदास भवार, रमेश बेंद्रे, ज्योती जाधव, ताजुद्दिन शेख, रमेश गायधने, विनायक सोमवंशी, दत्तात्रय पराड उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या