नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओडिशा सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशातील सर्वात मोठे रुग्णालय उभारणार आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकार देशात सर्वात मोठे कोविड-१९च्या उपचारासाठी रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयात १ हजार बेड असणार आहेत. पुढच्या १५ दिवसांमध्ये या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. ओडिशा सरकार, कॉर्पोरेट्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गुरुवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाची तयारी ओडिशा सरकारने सुरु केली आहे. ओडिशा हे देशातील पहिले राज्य आहे जे कोविड -१९ रूग्णांच्या उपचारासाठी खास मोठे रुग्णालय सुरु करणार आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटीच्या इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियममध्ये विलगीकरण कक्षाच्या बांधकामाला सुरुवात देखील केली आहे.
ओडिसामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेले फक्त दोनच रुग्ण आढळले आहेत. तर, देशामध्ये ६४९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.