पारनेर (तालुका प्रतिनिधी)
नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात दुभाजक फोडले असल्याने अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत तक्रारी आल्याने व दोन दिवसांपुर्वी त्यासंबंधी वरिष्ठ अधिकार्यांनी बैठक घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फोडलेले दुभाजक बंद करण्यास सुरूवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांत नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यात अनेक वाहन चालकांनी नियम मोडल्याचे समोर आले आहे. काही अपघात रस्त्याच्या कडेच्या व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण व बेकायदेशीर तोडलेले रस्ता दुभाजक यामुळे झालेले आहेत. याला सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात आले. तसेच महामार्गावरील त्रुटी भरून काढण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. नगर-पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी हॉटेल चालक व इतर व्यवसायिकांनी बेकायदेशीर रोड दुभाजक तोडलेले आहेत. या तोडलेल्या दुभाजकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यात अनेकांचे प्राण गेलेले आहेत. यामुळे नगर-शिरुर महामार्गाचे काम केलेल्या संबंधित कंपनीने फोडलेले दुभाजक दुरुस्तीला युद्ध पातळीवर सुरूवात केली आहे.
तसेच महामार्गावर पावसामुळे पडलेले खड्डे बुजवण्यस सुरूवात केली असून आवश्यक तेथे सूचना फलक लावले जात आहेत. दुभाजक दुरूस्तीचे काम करणार्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की कंपनीकडून वर्षभर रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम सुरू असते. महामार्गावर खड्डे पडू न देणे, सूचना फलक लावणे, दिशादर्शक खुणा करणे, याकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 ते 20 ठिकाणी रस्ता दुभाजक फोडले असून त्याच्या दुरूस्ती कामाला सुरूवात केली असून बेकायदेशीर दुभाजक फोडणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे.