Saturday, May 4, 2024
Homeनगरपरप्रांतीय मजुरांना देवळाली-गुहा शिवारात बेदम मारहाण

परप्रांतीय मजुरांना देवळाली-गुहा शिवारात बेदम मारहाण

राहुरी पोलिसांची बघ्याची भूमिका; त्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – इचलकरंजीहून दोन माल वाहतूक करणार्‍या ट्रकमधून आपल्या गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांना शनिवारी (दि.11) देवळाली प्रवरा-गुहा शिवारात पकडण्यात आले. मात्र, या लोकांना प्रशासनाच्या स्वाधीन करण्यापूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, काही वेळानंतर प्रशासकीय अधिकारी व पोलीस त्या ठिकाणी हजर झाले. त्यांचे समक्ष अतिउत्साही कार्यकर्ते मारहाण करीत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या व प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परप्रांतीय मजूर आणि महिलांना मारहाण करणारे हे टवाळखोर कार्यकर्ते कोण? त्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

इचलकरंजी शहरात मिलमध्ये काम करणारे पुरूष, महिला आपल्या लेकराबाळांसह सुमारे 48 कामगार दोन माल वाहतूक करणार्‍या ट्रकमधून राजस्थान, हरियाणा राज्यात निघाले होते.ताडपत्रीच्या आत बसल्याने त्यांचा जीव गुदमरला. लहान लेकरे पाण्यासाठी गयावया करू लागली. म्हणून ही मंडळी देवळाली-गुहा शिवावर एका हॉटेलमध्ये थांबले. ही बाब काही अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हातात दांडे घेऊन यातील काही मजुरांना अक्षरशः झोडपून काढले.

माराच्या भीतीने मजूर गुहाच्या दिशेने सैरावैरा पळत सुटले. प्यायला पाणी मिळाले नाही. मात्र, मार मिळाला. या मारहाणीत एका व्यक्तीच्या हाताला 7 ते 8 टाके पडले आहेत. या घटनेतील मजुरांना राहुरीच्या संत गाडगे महाराज आश्रम शाळेत ठेवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

या मजुरांनी लॉकडाऊन असताना गावी जाण्यासाठी केलेला प्रयत्न निश्चित चुकीचा आहे. मात्र, या मजुरांना इतक्या अमानुषपणे मारहाण करण्याचा अधिकार स्थानिक लोकांना कुणी दिला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मजुरांना मारहाण झाल्याचे माहीत असूनसुद्धा पोलीस व प्रशासनाने या माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटनेकडे दुर्लक्ष केले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, आम्हाला तुमचे जेवण नको. तुमची मदत नको, आम्हाला आमच्या गावी नेऊन क्वारंटाईन करा, अशी विनंती करीत असतानाच आज आम्हाला रवाना न केल्यास रात्री फाशी घेण्याचा इशाराही एका मजुराने दिला आहे. केवळ देवळाली प्रवरा शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासणारी ही घटना असून या मजुरांना मारहाण करणार्‍या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्याची मागणी देवळाली प्रवरा व गुहा गावातील सामजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे.

तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करणार
या परप्रांतीय मजुरांनी लॉकडाऊनचे नियम मोडल्याने त्यांना सध्या क्वारंटाईन केलेले आहे. त्यामुळे त्यांना घरी पाठविता येणार नाही. त्यांची सर्व सोय करण्यात आली आहे. मात्र, ते आपल्या गावी जाण्यावर ठाम आहेत. त्यांना मारहाण करणार्‍या जमावाचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना देण्यात आलेले आहेत. परप्रांतीय मजुरांनी तक्रार दिल्यास संबंधित मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करणार आहोत.
– फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या