Thursday, May 23, 2024
Homeनगरपुणतांब्यात एकजण करोना संशयित

पुणतांब्यात एकजण करोना संशयित

नागरिक भयभीत; आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

पुणतांबा (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील पुणतांब्यातील एक़ा 30 वर्षीय तरुणाला करोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यास संशयित म्हणून नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत त्यास आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

एका तरुणाला काही दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप येत होता. त्याने सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले त्यानंतरही त्याचा त्रास वाढू लागल्याने त्या तरुणाने सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्याशी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास पुन्हा तपासले असता त्याच्यात करोनाची काही लक्षणे आढळून आली. त्यास लोणी येथे रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यास एक्सरे काढून त्याची तपासणी केली असता त्याला निमोनिया झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

त्याची लक्षणे पहाता त्यास तातडीने नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या तरुणास आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या घशाचे स्त्राव घेऊन ते पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याच्या भावालाही आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तसेच या तरुणाच्या वडिलांनाही सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर त्या तरुणाच्या संपर्कात कोण कोण आले या सर्वांचा शोध घेत असल्याचे सरपंच डॉ. धनवटे यांनी सांगितले. करोना संशयित आढळल्याने पुणतांब्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सरपंच डॉ. धनवटे यांनी केले आहे.

चार पाच दिवसांपूर्वी हा तरुण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला असता प्राथमिक स्वरूपातील उपचार करण्यात आले; परंतु त्याला पाहिजे तसा फरक नव्हता म्हणून रविवारी रात्री त्याला परत आणण्यात आले त्याची तपासणी केली असता करोना संशयित लक्षणे आढळल्याने त्याला खबरदारी व त्याचे कुटुंब व गावच्या सुरक्षेसाठी रविवारी रात्रीच पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात भ्रमणध्वनीद्वारे माहिती घेतली संशयीत रुग्ण सुस्थितीत असून घाबरण्याचे काहीच कारण नाही.

– डॉ. कुंदन गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक पुणतांबा ग्रामीण रुग्णालय

सुरूवातीपासूनच गावात सर्वपक्षीय समिती स्थापन करून सर्वांच्या सहकार्याने खबरदारीचे सर्व उपाय करीत आहोत. गावात निर्जंतुकीकरण फवारणी करणे, गावच्या मुख्य रस्त्यावर सॅनिटायझरची फवारणी, वेळोवेळी नागरिकांना सूचना देणे गावातील व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यापार्‍यांना शासन नियमाप्रमाणे व्यावसाय सुरू ठेवण्यासाठी वेळेचे नियोजन केले. नागरिकांनी योग्य काळजी घेतली पाहिजे, सुरक्षीत राहिले पाहिजे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.

– डॉ. धनंजय धनवटे सरपंच तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या