Friday, November 15, 2024
Homeनगरराजुरीत भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या प्रतिष्ठितांना धक्काबुक्की

राजुरीत भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या प्रतिष्ठितांना धक्काबुक्की

धक्काबुक्की करणार्‍यांना गावात थारा नको; नागरिकांनी बैठक घेऊन केला निषेध

राजुरी (वार्ताहर) – गावातील भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींना भांडणे करणार्‍या लोकांनीच धक्काबुक्की केली, असल्याचा प्रकार राहाता तालुक्यातील राजुरी येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता घडला आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील राजुरी गावामध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजता गावातील एका कुटुंबातील वैयक्तिक भांडणे चालू होती. त्या भांडणाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होत असताना याची माहिती गावातील लोकांनी प्रतिष्ठित व्यक्तींना दिली. त्यानंतर हे गावात सुरू असणारे भांडण वाढून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही भांडणे सोडवण्यासाठी दोनतीन प्रतिष्ठित व्यक्ती गेल्या होत्या. या प्रतिष्ठित व्यक्तींनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असणार्‍या भांडणे करणार्‍या टारगट लोकांनी या दोन प्रतिष्ठित व्यक्तींना धक्काबुक्की केली.

अशा अपप्रवृत्तीला गावात थारा मिळू नये म्हणून गावातील नागरिकांनी बुधवारी सकाळी 11 वाजता राजुरी येथे गावकर्‍यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला गावातील आजी-माजी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तसेच अंदाजे सव्वाशे नागरिक उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांनी एकमताने असे ठरविले की इथून पुढे अशा भांडणे व हाणामारी करणार्‍या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना या गावांमध्ये थारा देऊ नये.

गावात राहणार्‍या व भांडणे करणार्‍या व्यक्तींनी गावात राहून दहशत बसविण्याचा प्रयत्न केला असून राजुरी गावात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशा गुन्हेगारी करणार्‍यांच्या हातून कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व गावात सलोखा कायम राहावा यासाठी अशा व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी व इतरत्र स्थलांतरित करावे, असे भांडणे करणार्‍या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. भांडणे करून गावात दहशत पसरविणार्‍या नागरिकांची माहिती लोणी पोलीस स्टेशनला व संबंधित पदाधिकार्‍यांना लवकरच देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या