अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांकडून जिल्ह्यातील तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या 18 तरुणांनी स्वतंत्रपणे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या होत्या. फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने भिंगार पोलिसांकडे असलेला तपास बुधवारी (दि. 15) आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या 18 तरुणांनी ऑगस्ट 2019 पासून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे 18 फिर्यादी दाखल केल्या. चार महिने झाले तरी गुन्हे दाखल झालेले संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) पसार आहेत.
भिंगार पोलिसांकडून पसार आरोपींना अटक होत नसल्याने तसेच, फसवणुकीची रक्कम सुमारे तीन कोटी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी फसवणूक झालेल्यांकडून होत होती. फसवणूक झालेले रमेश चक्रनारायण, विजय गाडेकर, नंदू कोतकर, रमाकांत आघाव यांनी काही दिवसांपूर्वी शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
फसवणुकीची रक्कम मोठी आहे. आम्हाला 25 लाखांपर्यंत तपास करण्याचा अधिकार आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा लागेल, असे उपाधीक्षक मिटके यांनी फसवणूक झालेल्यांना सांगितले होते. भिंगार पोलिसांनी बुधवारी (दि. 15) हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, बुधवारी तपास आला असून याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. गुन्हे दाखल होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहे. आरोपींना अद्याप अटक होत नसल्याने आता आर्थिक गुन्हे शाखा आरोपींना अटक करणार का? याकडे फसवणूक झालेल्यांचे लक्ष लागून आहे.