Saturday, November 23, 2024
Homeनगरबदलत्या काळात क्रिकेट खेळ व्यावसायिक व मनोरंजनामुळे जगप्रसिद्ध झाला – वेंगसरकर

बदलत्या काळात क्रिकेट खेळ व्यावसायिक व मनोरंजनामुळे जगप्रसिद्ध झाला – वेंगसरकर

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – आम्हाला टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये तटपुंजी तर त्यापेक्षाही कमी मानधन वन डे मध्ये मिळत होते; मात्र आम्ही देशासाठी खेळत असल्याच्या आनंदात मानधनाचा विचारही केला नव्हता, मात्र बदलत्या काळात क्रिकेट खेळ व्यवसायिक आणि मनोरंजनामुळे जगप्रसिद्ध झाला असल्याचे मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी शिर्डीत व्यक्त केले.

भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी शुक्रवारी दुपारी साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्याा वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना वेंगसरकर यांनी सांगितले की आपण गेल्या 40 वर्षांपासून साईदरबारी मिळेल तसा वेळ काढून येत असतो; मात्र यावेळी बर्‍याच कालावधीनंतर साईंच्या दर्शनाचा योग आला असून दर्शनाने खूप आत्मिक समाधान लाभले आहे.

मनोमनी आनंदी झालो असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.क्रिकेट खेळाच्या आजच्या काळातील बदल यावर बोलताना ते म्हणाले की, आत्ताच्या भारतीय संघात सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असून मेहनत आणि टॅलेंट ज्या खेळाडूंमध्ये आहे तेच यशाच्या शिखरावर पोहचू शकतात.

मात्र आता देशाच्या अनेक राज्यांतील ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू भारतीय संघाला लाभले असून खास नगर जिल्ह्यातून जहिरखान व अजिंक्य रहाणे यासारखे स्टार खेळाडूंनी भारताचं नाव वर्ल्ड कप जिंकून सुवर्ण अक्षराने कोरले आहे. याचा सार्थ अभिमान मला आहे असे बोलून सध्या ट्वेण्टी ट्वेण्टी क्रिकेटला जगभरातून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

त्यामुळे काळानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळात दिवसेंदिवस अनेक बदल व नवीन नियम बनत आहे. सध्या टेस्ट मॅचेस पाच दिवसांऐवजी चार दिवस खेळण्याचा निर्णय योग्यच असून नवीन नियम आणि प्रणालींमुळे खेळाडूंना त्याचा नक्कीच फायदा होत आहे. त्यामुळे क्रिकेट खेळ आणखी पारदर्शी आणि मनोरंजक होण्यासाठी त्याची मदत होत आहे.

वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून सध्याच्या संघामध्ये अनेक अष्टपैलू खेळाडू असल्याने भारतीय संघ जगामध्ये अव्वलस्थानी आहे. माझ्या आयुष्याच्या यशामध्ये साईबाबांचे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. यापुढेही मी मिळेल तसा वेळ काढून साईंच्या दरबारी येत राहीन, अशा भावना त्यांनी व्यक्त करत साई संस्थानचे आभार मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या