शिर्डी (शहर प्रतिनिधी)– आर्थिक संकटावर मात करण्यासाठी साईबाबा संस्थानने केवळ भाविकांच्या दानावर अवलंबुन न राहाता आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजे. शिर्डीतील व्यावसायिकांनी यापुढे भाविकांची लुटमार होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच सेवाभाव जपला पाहिजे तरच भविष्यात शिर्डीतील अर्थकारण पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असे परखड मत शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी व्यक्त केले.
तिरूपतीच्या धर्तीवर साईबाबा संस्थान व्यवस्थापक मंडळाने तातडीने आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिर्डीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट यांचा विचार करून संस्थानला आर्थिक निर्णय करण्याची गरज आहे. तिरूपती देवस्थान निव्वळ लाडू प्रसादाच्या माध्यमातून वर्षाकाठी 500 कोटी उत्पन्न मिळवत आहे. तर मग साई संस्थाननेही प्रसादालयातील भोजन सशुल्क करण्याबरोबरच दर्शन लाईनमधील भाविकांना मोफत दिला जाणारा बुंदी प्रसादाऐवजी पूर्वीप्रमाने लाडू प्रसाद विक्रीसाठी उपलब्ध करून दिला तर त्यातून साईंच्या झोळीत मोठा निधी उपलब्ध होवू शकेल.
साई संस्थानची साईआश्रम आणि द्वारावती भक्त निवासातील रूमचे दर वाढवण्याबरोबरच तेथे भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. साईनाथ रूग्णालय गेल्या काही वर्षापासुन पुर्णपणे मोफत करण्यात आले आहे. त्याचाही पुनर्विचार करण्याची गरज आहे. साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा टिकवण्यासाठी विविध उपाययोजनांची आवश्यकता आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर यापुढे साईसंस्थानला रूग्णालये, भक्तनिवास आणी प्रसादालय चालवावे लागेल अन्यथा साईसंस्थानची आर्थिक घड़ी विस्कटायला वेळ लागणार नाही.
शिर्डीतील काही तथाकथित काही लोक साईभक्तीच्या नावाखाली साईसंस्थानला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे असे प्रकार थांबवले पाहिजे. शिर्डीतील काही मंडळी आपणच खरे साईभक्त असल्याचा आव आणत स्वत:ला हरिश्चंद्र समजू लागल्याने उठसुठ सल्लागाराच्या भुमिकेत वागू लागले आहे. त्यांच्यामुळे शिर्डीच्या विकासावर मोठी विपरीत परिणाम होत आहे.
साईबाबा संस्थानने आता यापुढे लेझर शो, गार्डन यासारखे प्रलंबीत प्रकल्पांना चालना देण्यासाठी पुढाकार घेवून प्रलंबीत असलेले सर्वच प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. संस्थान कर्मचार्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावे यासाठी विविध उपाययोजना संस्थान प्रशासनाने करण्याची गरज असल्याचे कैलासबापू कोते यांनी शेवटी सांगितले.