Saturday, May 4, 2024
Homeनगरवाळू उपशामुळे पेडगाव हद्दीत भीमा पात्राची चाळण

वाळू उपशामुळे पेडगाव हद्दीत भीमा पात्राची चाळण

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र शांतता असताना बहुतांशी व्यवसाय, धंद्यांमध्ये शुकशुकाट असताना अवैध व्यवसाय मात्र तेजीत असल्याचे दिसत आहे. अवैध व्यवसायात सर्वात जोर धरलेली वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासन प्रयत्न करत असले तरी वाळूचे अवैध धंदे करणारे शिरजोर झाले असून भीमा नदीच्या पात्रात पेडगाव हद्दीत आता रात्रीचा राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे.

रात्रीच्या अंधारात काढलेली वाळू दिवसाच्या उजेडात लाखो रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे वनहद्दीत वाळूच्या उपशाबरोबर अनधिकृत रस्ते पाडले आहेत. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई होत नसल्याने हा गोरखधंदा तेजीत आहे.

- Advertisement -

भीमा, घोड़, हंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याच्या तक्रारी नदी काठचे गावकरी करीत असतात या वाळू तस्कारांविरोधात तक्रारी करत असतात. भीमा नदी पात्रातील अजनुज, गार, कौठा, पेडगाव हंगा नदी लगत हंगेवाड़ी, धायगुडेवाडी या गावच्या हदीतून वाळूतस्कर भरदिवसा वाळू तस्करी करीत आहेत. श्रीगोंद्याचे महसूल पथक, पोलीस पथक स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तस्करी रोखण्यासाठी जातात मात्र ठोस कारवाई होत नसल्याने हे व्यवसाय बंद होत नाहीत.

पेडगाव हद्दीत देखील भीमा नदी पात्रालगत असणार्‍या जंगल क्षेत्र वनविभागाकडे आहे. या क्षेत्रात अवैध वाळूचा उपसा रात्री सुरू आहे. जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून जंगलातून रस्ते तयार होताना कारवाई मात्र होत नाही. याच ठिकाणाजवळ मोठ्या प्रमाणावर वन जमिनी आहेत. यामध्ये जंगली झाडे आहेत. यात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असताना नैसर्गिक साधनांना हानी पोहचवत या जंगल क्षेत्रातील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात उपसत आहेत. ही वाळू उपसण्यासाठी थेट जेसीबी वापरले जात आहेत.

अवैध वाळूसाठी महिन्याला पावणेदोन लाखांची वाटणी
पेडगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात रात्री सहा ते सात जेसीबीने अनधिकृतरित्या वाळूचा उपसा करून वाळू साठवली जाते. हा वाळूच्या अवैध धंदा सुरू राहण्यासाठी तब्बल महिन्याला पावणेदोन लाख रुपयांची वाटणी करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या