संगमनेर (प्रतिनिधी)- नाताळ व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाच्यावतीने एक चारचाकी वाहन, दोन दुचाकी वाहने, गोवा निर्मीत विदेशी मद्याचे बॉक्स, बनावट बुचे, देशी दारू असा एकूण 5 लाख 26 हजार 970 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकार्यांना मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी सायंकाळी 6.30 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान गुंजाळवाडी ता. संगमनेर येथे सापळा रचण्यात आला होता. संशयीतरितीने येणार्या पांढर्या रंगाच्या मारुती कंपनीची स्वीफ्ट कार क्रमांक एम. एच. 04 डी. एन. 7765 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मीत महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या 750 मिली क्षमतेच्या 120 बाटल्या तसेच 180 मिली क्षमतेच्या 49 बाटल्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मिळून आल्या.
तसेच एका पोत्यामध्ये विविध ब्रँडची 520 बनावट बुचे मिळून आली. वाहनचालक जनार्दन निवृत्ती चुनाळे (वय 24, रा. सांगवी भुसार, ता. कोपरगाव) यास सदर गुन्ह्याखाली अटक करून 4 लाख 29 हजार 530 रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला. सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार किरण विलास घुले (सावरगाव घुले, ता. संगमनेर) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या कारवाईनंतर रात्री दुसर्या गुन्ह्यामध्ये निमज ता. संगमनेर तसेच संगमनेर खुर्द याठिकाणी अवैध देशी दारूची वाहतूक करताना दोन इसमांस पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 97 हजार 440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 24 डिसेंबरच्या कारवाईमध्ये एकूण 5 लाख 26 हजार 970 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यामध्ये एक चारचाकी मारुती स्वीफ्ट, व दोेन मोपेड दुचाकी वाहनांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोेलीस निरीक्षक आर. डी. वाजे, दुय्यम निरीक्षक आर. एल. कोकरे, पी. एस. कडभाने, जवान अनिल मेंगाळ, विजय पाटोळे, सुनील निमसे, तौसिफ शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. डी. वाजे करत आहे.