संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवार दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी खा. राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असे वादग्रस्त वक्तव्य खा. राऊत यांनी केले होते. त्यामुळे त्याचे पडसाद संगमनेरमध्येही उमटले. सायंकाळी 6 वाजता भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, भाजपाचे सरचिटणीस राजेंद्र देशमुख, चंद्रकांत घुले, राम जाजू, भैय्या परदेशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बसस्थानकाच्या आवारात एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी खा. राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
खा. राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. जोडे मारो आंदोलन झाल्यानंतर पोलीस तो प्रतिकात्मक पुतळा घेऊन गेले. यावेळी संगमनेर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी डॉ. इथापे म्हणाले, सत्ता राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे. पण त्यांच्यावरच राजकारण करून ही लोक आपली पोळी भाजत आहे.
आज प्रत्येकाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे आमच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
राजेंद्र देशमुख म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे खा. संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.