Monday, May 27, 2024
Homeनगरमुळा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा; महसूल खात्याचे दुर्लक्ष

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा; महसूल खात्याचे दुर्लक्ष

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – मुळा व प्रवरा नदी पात्रातील वाळू बांधकामासाठी दर्जेदार समजली जात असल्याने या वाळूला बाहेरील तालुक्यात चांगलीच मागणी वाढली आहे. पठार भागातील मुळा पात्रातील वाळू पुणे-मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर जात असून वाळूतस्करांनी मुळा नदी पात्रातून खुलेआम बेसुमार वाळू उपसा चालविला आहे. महसूल खात्याचे मात्र या वाळू तस्करीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून दरवर्षी मोठा वाळूउपसा केला जातो. अधिकृत लिलाव झालेला नसतानाही प्रवरा व मुळा या दोन्ही नद्यांच्या पात्रातून दररोज खुलेआम वाळूउपसा केला जात आहे. प्रवरा नदीपात्रालगतच्या मंगळापूर येथून रात्रीच्या सुमारास बैलगाड्या, चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत आहे.

- Advertisement -

मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ या अविर्भावात मंगळापूर येथील प्रवरानदीपात्रातून बिनदिक्कतपणे वाळू वाहतूक सुरू आहे. गत काही दिवसांपूर्वी वाळू वाहतूक करणार्‍या दोघांवर कारवाई झाली होेती. मात्र अद्यापही रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. कासारा दुमाला ते जोर्वे या गावांमधून वाळूची अनेक वाहने ये-जा करताना सातत्याने दिसतात. पठारभागातही अशीच अवस्था आहे.

मुळा नदी पात्रालगतच्या साकूर, मांडवे, जांबूत व इतर गावांमधून वाळू मोठ्या प्रमाणावर उचलली जाते. पठार भागातील वाळू थेट पुणे, मुंबईपर्यंत पाठवली जात आहे. वाळूचे अनेक डंपर वाळू वाहतूक करताना दिसतात. महसूल खात्याच्या स्थानिक तलाठी, मंडलधिकारी यांचे मात्र या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. वाळूतस्करांशी असलेल्या संबंधांमुळे हे स्थानिक अधिकारी वाळू वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. मध्यंतरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वतः जाऊन वाळू वाहतूक करणार्‍यांविरुद्ध कारवाई केली होती.

वाळूतस्करांची मोठी यंत्रणा संगमनेर तालुक्यात कार्यरत आहे. अधिकार्‍यांच्या हालचालीकडे या यंत्रणेचे बारीक लक्ष असते. त्यामुळे अनेकदा कारवाईपासून ते वाचलेले आहे. वाळू वाहतुकीला विरोध करणार्‍या नागरिकांचा विरोध त्यांनी मोडून काढला आहे. या वाळूतस्करांची दादागिरी वाढत चालली असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वाळू वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी एका डंपरने धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले होते. यापैकी एकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. महसूल व पोलीस खात्याच्या अधिकार्‍यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या