40 तोळे सोने, दोन किलो चांदीचा समावेश, पानेगाव-सोनई-खेडले रस्त्यावरील सायंकाळची घटना
मांजरी, वळण (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सराफाचे दुकान आटोपून घरी परतणार्या निखील बाळासाहेब आंबिलवादे (रा. खेडले परमानंद, ता. नेवासा), येथील सराफाला अज्ञात तीन चोरट्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटले. या घटनेत सराफाकडील सुमारे 40 तोळे सोने आणि दोन किलो चांदी असा सोळा लाख रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. ही घटना काल मंगळवारी (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पानेगाव-सोनई-खेडले रस्त्यावर घडली.
दरम्यान, भरदिवसा सराफी व्यापार्याला लुटल्याने व्यापार्यांमध्ये दहशत पसरली आहे. आंबिलवादे यांचे राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सराफी दुकान आहे. ते रोज खेडल्यावरून मांजरी येथे ये-जा करत असतात. काल सायंकाळच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकानाचे कामकाज आटोपून नेवासा तालुक्यातील खेडले येथे दुचाकीवर जात असताना तीन अज्ञात तरुणांंनी दुचाकीवरून येऊन आंबिलवादे यांना रस्त्यातच नदीकाठाजवळ थांबवून त्यांना रस्ता कोठे जातो ? असे विचारले.
त्यावर दुसर्या तरुणाने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि हल्ला चढविला. निखील यांना काही समजण्याच्या आत त्यांच्या दुचाकीला अडकविलेली सोन्या-चांदीचा ऐवज असलेली बॅग हिसकावून दुचाकीवरून धुमस्टाईल पोबारा केला.
दरम्यान, काही वेळाने समोरून येणार्या एका दुचाकीस्वाराने जखमी अवस्थेत असलेल्या आंबिलवादे यांना तातडीने मांजरी येथील दवाखान्यात उपचारासाठी आणले. ही खबर सोनई पोलीस ठाण्यात कळताच तेथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच एक महिन्यापूर्वी पानेगाव येथे रात्री मध्यरात्री पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. त्यावेळी पोलिस निरीक्षक देशमुख यांनी पानेगाव येथील नागरिकांना सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली होती. दरम्यान, अप्पर पोलिस अधिक्षक दीपाली काळे, शेवगावचे डीवायएसपी मंदार गवळी यांनी मांजरी येथे येऊन आंबिलवादे यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी घडलेली हकीकत कथन केली.