Saturday, November 16, 2024
Homeनगरशालेय परिपाठात रोज वाचली जाणार राज्यघटनेची प्रस्तावना

शालेय परिपाठात रोज वाचली जाणार राज्यघटनेची प्रस्तावना

संगमनेर (वार्ताहर) – येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यात शालेय स्तरावरील होणार्‍या परिपाठादरम्यान भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना नियमित वाचण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेने अपेक्षित केलेली तत्वे आणि पुरोगामी विचारधारा पुरविण्याच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे हा निर्णय देखील येत्या 26 जानेवारीपासून शाळांमध्ये अंमलात आणला जाणार आहे. या निर्णयाचं अनेक स्तरांतून स्वागत होत आहे. येत्या 26 जानेवारीपासून राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी घेतल्या जाणार्‍या परिपाठामध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक यासंदर्भातला निर्णय 4 फेब्रुवारी 2013 रोजीच जाहीर करण्यात आला होता.

मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं लक्षात आलं होतं. त्यामुळे अखेर राज्यसरकारने त्यासंदर्भातला दुसरा जीआर काढून येत्या 26 जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यघटनेतल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूलतत्वे समाजमनावर कोरली जावीत, लहानपणापासूनच विद्यार्थ्यांवर संविधानातील तत्वांचे संस्कार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले.

असा असेल परिपाठ
राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू होण्यापूर्वी नियमितपणे परिपाठ घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .त्या परिपाठात प्रतिज्ञा, राष्ट्रगीत ,प्रार्थना याबरोबर सामान्य ज्ञान, बातम्या वाचन ,श्लोक, पसायदान, समूहगीत ,गोष्ट यासारख्या विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या परिपाठात यापुढे नियमितपणे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनाचे वाचन केले जाणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या