Monday, May 27, 2024
Homeनगरसेवा उद्योगातील 6 हजार कलाकार-कामगारांवर उपासमारीची वेळ

सेवा उद्योगातील 6 हजार कलाकार-कामगारांवर उपासमारीची वेळ

नेवासा तालुक्यात लग्न-जागरण गोंधळ कार्यक्रमाशी निगडीत

नेवासा तालुका – करोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका रोज काम करून पोटाची खळगी भरणार्‍या कुटुंबांना बसला आहे. मागील 2 महिन्यापासून बँड पथकातील कलाकार, गायन-वाद्यवृंदाचे काम करणारे कलाकार, जागरण गोंधळ पार्टीतील कलाकार, लग्न समारंभात तुतार्‍या वाजविणारे-मनोरंजन करणारे कलाकार व आचारी-केटरर्स यांचेकडे काम करणारे मजूर अशा सुमारे 6000 हजाराहून अधिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील हे सेवा उद्योग लॉकडाऊन झाल्याने मागील दोन महिन्यात सुमारे 10 कोटीहुन अधिक नुकसान झालेले आहे. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने त्याचा असंघटित क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. वाद्यवृंदाशी संबंधित बँड पथकातील कलाकार, गायन-वाद्यवृंदाचे काम करणारे कलाकार, जागरण गोंधळ पार्टीतील कलाकार, लग्न समारंभात तुतार्‍या वाजविणारे-मनोरंजन करणारे कलाकार व आचारी-केटरर्स यांचेकडे काम करणारे मजूर या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यात मंगल कार्यालय सफाई कामगार, फुले सजावट,गायक, वादक, निवेदक, ध्वनी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, संयोजक यांचा समावेश आहे. तब्बल 2 महिन्यापासून कार्यक्रम नसल्यामुळे कलाकार हवालदिल झाले आहेत.लॉकडाऊनफमुळे या पुढील अजून 2 ते 3 महिने कार्यक्रम होणार नाही. परिणामी कलाकारांना घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. काही कलाकारांची उपासमार सुरू असल्याने तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नेवासा तालुक्यात लग्न समारंभ,जागरण गोंधळ, संगीत-गायण, स्वागत, केटरर्स या सेवा उद्योगाशी निगडीत जवळपास 6977 पेक्षा जास्त कलाकार-कामगार असून हे सेवा उद्योग सध्या बंद असल्याने त्यांच्या रोजच्या अन्नपाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर्षी लग्नतिथी अधिक असल्याने लग्नांची धामधूम सुरू असतानाच करोना लॉकडाऊन सुरू होऊन गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून मंदिरे, मंगल कार्यालये,नाट्य व सभागृह बंद करण्यात आले.नेवासा तालुक्यात 35 हुन अधिक मंगलकार्यालये आहेत. सर्वांच्या मागील दोन महिन्यात प्रत्येकी किमान 40 तारखा रद्द कराव्या लागल्या आहेत. म्हणजेच 35 मंगल कार्यालयाच्या 1400 तारखा व लग्न रद्द झाल्याने सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडालेले आहे.

लग्न कार्याला जोडून जागरण गोंधळ घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे. दर वर्षी एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती पासून जागरण गोंधळाचे कार्यक्रमाना सुरुवात होऊन पूढे 15 जून प्रयत्न म्हणजेच चांगला पावसाळा सुरू होईपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहतात.तालुक्यात 25 हुन अधिक गोंधळ पार्ट्या आहेत. प्रत्येक पार्टीत पार्टी प्रमुखासह किमान 6 कलाकार असतात.

या अडीच महिन्यात एका एका पार्टीकडे किमान 75 कार्यक्रम असतात. एका कार्यक्रमाची बिदागी साधारणतः 6 हजार रुपयांपर्यंत असते. म्हणजेच कार्यक्रम रद्द झाल्याने गोंधळ पार्त्यांचे सुमारे 1.25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बँड पथक हा लग्न समारंभाचा अविभाज्य घटक आहे.तालुक्यात जवळ पास 35 बँड पथके आहेत.त्यांची कामे ही 2 महिन्यापासून बंद आहेत.प्रत्येक बँड पार्टीकडे महिन्याला 20 सुपार्‍या गृहीत धरल्या तर एका सुपारी वाजविण्याची बिदागी सरासरी 20 हजार गृहीत धरले तर सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांचे काम बुडालेले आहे.

या व्यतिरिक्त लग्न बस्ता करणारे कापड दुकाने, लग्नाचे जेवणासाठीचा किराणा माल पुरवठा करणारे किराणा दुकाने, अक्षता तयार करणारे, लग्नपत्रिका छापणारे कारागीर यांचेही उत्पन्न बुडालेले आहे. एकंदर काय तर लग्न समारंभावर आवलंबुन असणारे छोटे-मोठे सेवा उद्योग बंद पडल्याने कलाकार व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांची उपजीविकेचे साधनच लॉकडाऊन झाल्याने हे लॉक कधी उघडते याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे.

पदरमोड करून कलाकार संभाळण्याची वेळ
गेल्या 2 महिन्यांपासून लग्न समारंभ बंद असल्याने उत्पन्न बंद झाले आहे. कलाकार पुन्हा मिळत नाही म्हणून त्यांना या काळातसुद्धा पदरमोड करून सांभाळावे लागत आहे. शासनाने बँड कलाकारांना आर्थिक मदत करावी.
– सुरेश आढागळे, ब्रास बँड पार्टी प्रमुख, सौंदाळा

लग्नासाठी 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी द्या
सध्या मंगलकार्यालयांचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. बँकांचे कर्ज काढून मोठी गुंतवणूक केली. मात्र लॉकडाऊनमुळे या दोन महिन्यात माझ्याकडे बुक झालेल्या 45 तारखा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार देणे व बँकांचे हप्ते भरणे मुश्कील होत आहे. शासनाने किमान 200 लोकांची उपस्थिती ठेऊन मंगलकार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे.
– मोहन काळे, मंगल कार्यालय व्यावसायिक, भेंडा

- Advertisment -

ताज्या बातम्या