अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात महाविकास आघाडी करून भाजपला जसे सत्तेपासून दूर ठेवले, त्याच पद्धतीने देशात काही करता येईल का, याबाबत अद्याप चर्चा झाली नसली, तरी पर्याय द्यायचा असल्यास यावर निश्चितपणे विचार होऊ शकतो, तशी चर्चाही होईल, असे सुतोवाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
ज्येष्ठ नेते रामनाथ वाघ यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पवार गुरूवारी नगरमध्ये आले होते. त्यानंतर हेलिपॅडवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले. ते म्हणाले, पर्याय मिळावा ही जनतेची इच्छा आहे. मात्र तो कोणताही एक पक्ष देऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचीच गरज आहे.
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडून प्रेरणा घेतल्याचे म्हटले आहे. तसे मी वाचले आहे. अशीच प्रेरणा इतर ठिकाणीही घेतली गेली पाहिजे. पर्याय द्यायचा असल्यास, सर्वांनी मिळून समान कार्यक्रम निश्चित केला पाहिजे. हा कार्यक्रम घेऊनच एकत्र आले पाहिजे. यासाठी आपण निश्चित चर्चा करू.
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटपास विलंब झाल्याचे मला वाटत नाही, असे सांगत पवार म्हणाले, एका पक्षाचे सरकार असले तरी मंत्र्यांच्या शपथविधीनंतर दोन-चार दिवस खातेवाटपास लागतातच. येथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. खातेवाटपाचा निर्णयही पुर्णपणे झालेला आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने आमच्या पक्षात कुठेही नाराजी नाही. उलट मी काही जणांना गृहमंत्रीपद घेता का, असे विचारले असता नको, असे उत्तर दिले. याचाच अर्थ आमच्याकडे नको म्हणणारे आहेत.
नगरबाबत वेगळा विचार.. आतापर्यंत संधी न मिळाल्यानेच राहुरीला न्याय
मंत्रिमडळात कोणाला संधी द्यायची, यासाठी नगरबाबत मी जरा वेगळा विचार केल्याचे सांगत पवार म्हणाले, अकोलेला अनेकदा संधी मिळाली. शिर्डी व श्रीगोंद्यामध्येही कोणीतरी मंत्री होते. कोपरगावलाही होते. फार पूर्वीचा विचार केल्यास नगर शहरातही मंत्रिपदाची संधी मिळालेली होती. या सर्वांमध्ये राहुरीच मला एकमेव रिकामी दिसली. या निमित्ताने युवकाला संधी देण्यात आल्याचेही पवार म्हणाले.