Saturday, May 4, 2024
Homeनगरशिर्डीची ‘ती’ महिला होम क्वारंटाईन

शिर्डीची ‘ती’ महिला होम क्वारंटाईन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात राहाणार्‍या त्या 60 वर्षीय महिलेस कोरोनासदृष्य लक्षणे आढळल्याने सदर संशयित महिलेला तपासणीसाठी प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी स्त्रावचे नमुने न घेताच फक्त तपासणी करून होम क्वारंटाईनचा शिक्का मारून सदर महिलेला मागच्या पाऊलांनी पुन्हा शिर्डीला रवाना केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील लक्ष्मीनगरमधील 60 वर्षीय महिलेला कोल्हार येथून आपल्या राहात्या घरी प्रवास करून आल्यानंतर सर्दी, ताप खोकला येत असल्याने तिने सावळीविहीर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले होते. मात्र त्यानंतरही तिला त्रास होऊ लागल्याने साईनाथ रुग्णालयात उपचार घेतले. सदर घटनेबाबत प्रशासकीय अधिकारी यांना समजताच या महिलेला नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी घशातील स्रावाचे नमुने न घेताच फक्त गोळ्या औषधे देऊन तात्काळ मागच्या पाऊलांनी पुन्हा शिर्डीला पाठविले.

- Advertisement -

शिर्डीत हृदयरोग तज्ञांकडे दाखवून घेण्यासाठी सल्ला दिला आहे, असे असले तरी या महिलेला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून पाठविण्यात आल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान काही डॉक्टरांच्या मते सदरील महिलेला न्युमोनिया झाला असल्याचे तर काहींच्या मते दमा आणि त्यानंतर तिला हृदयविकाराचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमका काय आजार आहे हे अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याने संभ्रम निर्माण होऊन प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. महिलेच्या सर्दी खोकला ताप या लक्षणांवरून तर्कवितर्क लढविले जात आहे. तरीदेखील प्रशासनाच्यावतीने सर्व रहिवाशांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर महिलेला संशयित म्हणून नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र कोरोनाचे लक्षण आढळून न आल्याने तिला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले आहे. तिच्या परिवार निगराणीखाली असून येथील रहिवाशांनी भयभीत न होता काळजी घेण्याची गरज आहे. जोपर्यंत लाँकडाऊन संपत नाही, तोपर्यंत बाहेरून येणार्‍या नातेवाईक अथवा घरातील व्यक्तींना घरात न घेता आहे त्याच ठिकाणी राहू द्यावे, विनाकारण घराबाहेर पडू नये.
– मंगेश त्रिभूवन, उपनगराध्यक्ष, शिर्डी नगरपंचायत.

- Advertisment -

ताज्या बातम्या