अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्त दरात गरजूंना भोजन मिळावं यासाठी आखण्यात आलेल्या 10 रुपयांत ‘शिवभोजन’ योजना 26 जानेवारीपासून राज्यभरात सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांतील केंद्रांसाठी 6 कोटी 48 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात नगरच्या वाट्याला 25 लाख 20 हजार रुपयांचा निधी आला आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी 10 रुपयांत शिवभोजन योजनेची सुरुवात होत आहे. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन मिळणार आहे.
शिवभोजन योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुगाणालय, बस स्थानक, रेल्वे परिसर, महानगरपालिका परिसरात एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. नगरमध्ये सात ठिकाणी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नगरमधील केंद्रांमध्ये दररोज 700 थाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापोटी 25 लाख 20 हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने ही केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.