Monday, May 27, 2024
Homeनगरशेवटच्या श्वासापर्यंत दर्शनासाठी येणार

शेवटच्या श्वासापर्यंत दर्शनासाठी येणार

शिवराजसिंह चौहान यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- मी मुख्यमंत्री असताना दर्शनासाठी शिर्डीला येत होतो आणि नसतानाही साईबाबांच्या दरबारी आलो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत बाबांच्या दर्शनासाठी येणार असल्याचे प्रतिपादन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शिर्डीत केले.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी आपल्या परिवारासह साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, माजी विश्वस्त सचिन तांबे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

श्री. चौहान म्हणाले की, साईबाबा मला बोलवतात त्यामुळे मी शिर्डीला येतो. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहेत तोपर्यंत मी शिर्डीची वारी करीत राहणार असून हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे जावो तसेच सर्वावर साईबाबांची कृपादृष्टी लाभो अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. याबरोबरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती व्हावी, असे साकडे साईबाबांना घातले. बाबांकडून आम्हाला श्रद्धा, सदबुद्धी, सामर्थ्य मिळावे त्यामुळे चांगले काम करता येईल, असे त्यांनी सांगितले.

देशातील विविध राज्यांमध्ये भाजपच्या होणार्‍या पराभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक राज्यातील निवडणुकीचे मुद्दे वेगळे असून राजकारणात हारजीत होत असते. पक्षातील अनेक नेते बाहेर पडत असल्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, हे केंद्र व राज्यातील मुद्दे आहे. लोकसभेत आमच्या पक्षाला जनतेने मोठ्या संख्येने कौल दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक नागरिकाचे समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यातील जनाधाराचा अपमान केला असल्याचे त्यांनी बोलून दाखवत निवडणकीपूर्वी राज्यात सेना भाजप युती होती. मात्र निवडणूक झाल्यावर युतीचे सरकार स्थापन झाले पाहिजे, असे जनतेच्या भावना होत्या अशी खंत व्यक्त करत हे सिद्धांत विरहित सरकार असून दीर्घकाळ चालणार नसल्याची टीका त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या