नाशिक । प्रतिनिधी
राजकारणात काहीही होऊ शकते हे नेहमी बोलले जाते.नाशिक मध्येे याचे चित्र पुन्हा पहायला मिळाले.शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे गोडवे गायले.दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’सर्वोत्कृष्ट असल्याची पावतीच त्यांनी दिली.
या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र सदन उभारणीत कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सांगत पुन्हा एकदा भुजबळांना क्लिन चीट दिली.त्यांची क्लिन चीट देण्याची ही पहिलीच वेळ नाही.आता तर राष्ट्रवादीच्या टेकूवर शिवसेनेचे मुख्यमंत्री पद टिकून आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदन पाहुणचाराच्या गोडव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा बाला डान्स आपण पाहिलात का?
सत्ता स्थापन झाल्यानंतर देखील संजय राऊत अधूनमधून त्यांच्या खास शैलीत फटाके फोडत आहे.नाशिकमध्ये जिल्हा परिषदच्या नूतन प्रशासकीय वास्तू भुमीपूजनाला संजय राऊत व छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर आले होते.त्यामुळे राजकीय जुगलबंदी रंगणार हे ओघाने आलेच.
दोघांनीही एकत्र कुदळ मारत भूमीपुजन केले.त्यावेळी राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’शैलीत फटाके फोडलेच.त्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे कौतुक जादा होते.छगन भुजबळ यांनी दिल्लीत फूकटात उभारलेले महाराष्ट्र सदन ही इमारत सर्वोत्कृष्ट असून, महाराष्ट्रा बाहेरीलही व्यक्ती दिल्लीत आल्यानंतर तिचे तोंडभरुन कौतुक करते.कायम स्मरणात राहिल, अशी इमारत उभी राहिली म्हणून महराष्ट्र सदन दिल्लीत उठून दिसते, अशा शब्दात भुजबळांचे गोडवे गायले.
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे.त्यामुळे या कौतुकात यंदा गोडवा जरा जादा होता.यापुर्वी भुजबळांवर महाराष्ट्र सदन उभारणीत घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन राजकीय वातावरण तापले होते. मात्र,भुजबळ तुरंगात असताना संजय राऊत यांनी या घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना क्लिन चीट दिली होती.
नाही तरी एसीबीने देखील गैरव्यहाराच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. राऊत हे सर्वाधिक वेळ दिल्लीत राहतात. दिल्लीतील शिवसेनेचे सर्वात मोठे नेते अशी त्यांची ओळख आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सदनचा सर्वाधिक पाहूणचार त्यांनी घेतला असावा. त्यामुळे ही वास्तू उभारण्यात घोटाळा झाल्या नसल्याचे ते सांगत असावे. नाही तरी भुजबळ जामिनावर बाहेर आल्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांनी महाराष्ट्र सदन उभारणीत घोटाळा झाल्या नसल्याचा दावा केला होता. भुजबळांनी देखील ‘मातोश्री’वर पेढयाचा बॉक्स पाठवत शिवसेनेचे आभार मानले होते.
भूमीपुजनाच्या कार्यक्रमाने महाराष्ट्र सदनाच्या पाहुणचाराला पुन्हा एकदा राऊत यांनी उजाळा दिला.आता या गोडव्याचे महत्व अधिक आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या टेकूवर सेनेचा मुख्यमंत्री विराजमान आहे. शिवाय गृहखाते हे देखील राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हे सरकार अस्तित्वात असेपर्यंत तरी महाराष्ट्र सदन गैरव्यवहार हा मुद्दा उपस्थित होणार नाही.हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. राऊत यांनी गायलेले गोडेव हेच दर्शवत आहेत.
नाशिककरांना सल्ला
महाराष्ट्र सदन चे कौतुक करताना खासदार राऊत यांनी नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारच्या शासकीय चांगल्या वास्तू नाशिकमध्ये उभारायचा असतील तर ना.छगन भुजबळ यांचे मार्गदर्शन घ्यावे,असा सल्लाही नाशिकच्या लोकप्रतिनिधींना राऊत यांनी दिला.