Friday, May 3, 2024
Homeनगरआरोपांच्या डरकाळ्या

आरोपांच्या डरकाळ्या

शिवसेनेच्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यास सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग सहामधील दारूण पराभवाचे कवित्त्व आता सुरू झाले असून, शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांवर खापर फोडतानाच दुसरा गट राष्ट्रवादीच्या सहभागामुळे तोटा झाल्याचे खासगीत सांगत आहे. भविष्यात यावरून वाद वाढत जाऊन शिवसेनेतील दोन्ही गटातील अंतर वाढत जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

- Advertisement -

प्रभाग सहामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होऊन त्यामध्ये शिवसेनेचा दारूण पराभव झाला. एखाद्या प्रभागात एक हजार 700 मतांच्या फरकाने पराभव होणे आणि विशेष म्हणजे शिवसेनेचा उमेदवार ज्या ठिकाणी निवडून आला होता, त्याच ठिकाणी चितपट होण्याची वेळ येणे नामुष्कीजनक आहे. अर्थात हा पराभव का झाला, याची कारणे काय आहेत, यावर अद्याप ना शिवसेनेने चिंतन केले ना कथित महाविकास विकास आघाडीने विचार केला. आपला पराभव होणार, हे जणू गृहित धरूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ‘पराभूत मानसिकतेत दुसरे काय होणार?’ असे आता महाविकास आघाडीतूनच बोलले जात आहे.

या पराभवामुळे शिवसेनेची बरीच गणिते बिघडली आहेत. आगामी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आतापासूनच तयारी करत आहे. अर्थात त्यांच्यात आता दोन गट पडल्याने महापौरपदाच्या उमेदवारीवरूनही बरेच महाभारत घडण्याची चिन्हे आहेत. मात्र शिवसेनेकडे महापौरपद घ्यायचे, यासाठी किमान सर्वांचे एकमत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आल्याने येथील शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राष्ट्रवादी सध्या जरी महापालिकेत भाजपसोबत असली, तरी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने आगामी महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत राहील. नगरसेवकांची संख्या एकने कमी झाली असली, तरी आजही शिवसेना महापालिकेत एक क्रमांकाचाच पक्ष आहे. त्यामुळे महापौरपद आपल्यालाच मिळेल, असा व्होरा आहे. मागील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीला त्याची किंमत चुकवावी लागली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता ते धाडस राष्ट्रवादी करणार नाही, असेही मानले जाते. यामुळेच शिवसेनेतील फुटीर गट राष्ट्रवादीशी जवळिक निर्माण करण्यासाठी झटत आहे.

असे असले तरी उपनेते अनिल राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या दुसर्‍या गटाला राष्ट्रवादीशी जवळिक नको आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण विसरण्यास हा गट तयार नाही. याचाच परिणाम प्रभाग सहामध्ये दिसल्याचा दावाही या गटाकडून केला जात आहे.

शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि शिवसेना हेच एकमेकांच्या विरोधात असलेले दोन प्रमुख पक्ष असल्याने आपले राजकारण जीवंत ठेवण्यासाठी या दोन्ही पक्षातील नेत्यांना एकमेकांच्या जवळ येणे मान्य नाही. एवढेच नव्हे, तर शिवसेनेत पडलेली दुही राष्ट्रवादीची फूस असल्यामुळेच पडल्याचे मत असल्याने शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित दिसणे शिवसेनेच्या एका गटाला मान्य नाही. त्यामुळेच प्रभाग सहामधील पराभवाला भाजपचे वर्चस्व न मानता एकमेकांवर खडे फोडण्याचे काम सुरू आहे.

भाजपच्या वर्चस्वाचीही भिती
शहराच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी असाच संघर्ष असल्याने दोन्ही पक्षाकडे झुकणारा मतदार मोठा आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र दिसल्यास त्याचा फायदा भाजपला होण्याची भिती व्यक्त होत आहे. शिवसेनेला मानणारा हिंदुत्त्वादी मतदार यामुळे भाजपला पर्याय म्हणून निवडण्याची भिती असल्याने शिवसेनेतील कट्टर हिंदुत्त्ववादी विचाराचे नेते राष्ट्रवादीला जवळ घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या