Sunday, November 17, 2024
Homeनगरशिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर; शिंदे यांनी दंड थोपटले

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर; शिंदे यांनी दंड थोपटले

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमुळे पक्षातील दुही आली समोर

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली असून, जिल्हा नियोजन निवडणुकीच्या कारणावरून उघडपणे फूट पडल्याचे दिसत आहे. महापालिका क्षेत्रातील जागेसाठी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांतच लढत होणार असल्याने शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस अशी अनोखी युती आहे. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आले असून, भाजपच्या हवाली महापालिका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या उपकारामुळे भाजपच्या महापौरांसह बहुतांश नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारापासून दूर राहत राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदत केली. असे असतानाही अवघ्या अकरा हजारांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचा पराभव झाला.

मात्र या पराभवातून काही शिकण्याच्या मानसिकतेत येथील शिवसेना नसल्याचे दिसून येत आहे. पराभवाच्या दुस़र्‍या दिवसांपासूनच शिवसेनेच्या काही नगरसेवकांवर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप सुरू झाला. विधानसभेतील उमेदवार व उपनेते अनिल राठोड यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या फेसबूक पेजवर असा आरोप करणारा मजकूर झळकला. एवढेच नव्हे, तर मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत नगरसेवकांना टाळण्यात आले. त्यामध्ये काही नगरसेवकांबाबत शेलक्या शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक अऩिल शिंदे आणि माजी महापौर व नगरसेविका सुरेखा कदम यांचे पती माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांचे नाव घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कदम, शिंदे यांच्यासह त्यांच्या जवळ असलेले नगरसेवक नाराज झाले.

जिल्हा नियोजन निवडणुकीत महापालिका क्षेत्रातून तीन जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यातील एक जागा भाजपने आशाताई कराळे यांच्या रूपाने बिनविरोध मिळविली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आणि भाजप विरोधात असताना येथे मात्र भाजपच्या विरोधात कोणीही अर्ज न ठेवल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शिवसेनेने ही जागा का सोडली, याबाबतही चर्चा आहे. सर्वसाधारण जागेवर शिवसेनेत नाराज असलेले नगरसेवक अनिल शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्याच पक्षाचे ज्ञानेश्‍वर येवले यांच्याशी त्यांची लढत होईल.

दुसर्‍या एका जागेसाठी राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुधे आणि सुवर्णा जाधव यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेचे शिंदे यांना राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि बसप यांची मदत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेने वेळीच नियोजन करून बैठका घेत एकच उमेदवार देण्याचे ठरविले असते तर पक्षातील ही दुही समोर आली नसती. अर्ज माघारीवेळीही एकाला कोणाला उमेदवारी मागे घेण्यास सांगितले असते तरी शिवसेनेच्या पदरात एक जागा बिनविरोध पडली असती. मात्र उपनेते राठोड आणि शहरप्रमुख दिलीप सातपुते यात कमी पडले. नाराज नगरसेवकांमधून या दोघांवरच खापर फोडले जात आहे.

किती नगरसेवक फुटणार?
शिंदे यांनी मते मिळविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस यांच्याशी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांचीही साथ असल्याचे सांगितले जाते. यात शिवसेनेच्या 23 पैकी 18 नगरसेवक शिंदे यांच्यासमवेत असल्याचे बोलले जाते. हे सर्व शिंदे यांच्या पाठीशी राहतील आणि दुसर्‍या जागेसाठीच्या निवडणुकीत पाऊलबुधे यांना साथ देतील, असाही दावा केला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या